नागपूर : गणेश चुतर्थीच्या दिवशी नवीन संसद भवनात कामकाज सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात नेमके काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु विरोधी पक्षांच्या मागणीला साद घालत त्यांनी महिला आरक्षणाचे विधेयक सादर केले. महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. पण ते आगामी निडवणुकांमध्ये नव्हे.
त्यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, की नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन जुमला अशा शिर्षकाचे त्यांनी एक्स(टिट्व) केले. मोदी सरकारने गाजावाजा करत नवीन संसद भवनाचे उदघाटन केले. मात्र, संसदेच्या नवीन भवनात देखील मोदी सरकारने जनतेला जुमलाच दिला. महिला आरक्षणाचा विचार सर्वप्रथम काँग्रेसने मांडला होता.
हेही वाचा : “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान
आजही काँग्रेस पक्षाने सर्व स्तरातून या विधेयकाचे स्वागत करीत पूर्ण पाठिंबा दिला. पण, आज आणलेल्या विधेयकानुसार महिलांना हे आरक्षण जनगणना झाल्यावर मिळणार आहे. २०२१ ची जनगणना अजून सुरू झालेली नाही. म्हणजे हे आरक्षण येत्या निवडणुकांमध्ये लागू होणार नाही. नवीन संसदेत पहिल्याच दिवशी मोदी सरकारने देशातील महिलांची दिशाभूल केली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.