नागपूर : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले, “माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक निर्णय घेण्यामागचे कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांची कोणाशी चर्चा झाली किंवा नाही, याबाबत आपल्याला कल्पना नाही. पण त्यांची माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्याबरोबर १६ वर्षांपासून आपण काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एकदा नव्हेतर दोनदा होतो. त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि त्यामुळे कदाचित चव्हाण यांनी पक्षांतर केल्यास वडेट्टीवार देखील करतील, अशा वावड्या उठवल्या जात असतील. परंतु स्पष्टपणे सांगू इच्छितो यात काही तथ्य नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडेट्टीवार पुढे म्हणाले, “चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करू शकतील. मात्र, मधल्या काळात त्यांच्यामागे अनेक चौकशींचा फेरा लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती. परंतु ती चौकशी नेमकी कशाची होती, हे काही कळले नाही. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक आहे. पण, ज्या पद्धतीने भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे, या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदारराजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल”, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : वीजदर सवलतीवर मर्यादा, न्यायालयात याचिका…

मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी केल्यास ओबीसींचे आरक्षण संपेल

राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक येण्याची शक्यता आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. पण, मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसींचे आरक्षण मराठा समाजाला मिळेल आणि ओबीसींसाठी काही शिल्लक राहणार नाही. ओबीसींचे प्रचंड नुकसान होईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असे वारंवार सांगून सत्ताधारी धक्का लावणार असतील तर मात्र आम्ही त्यास विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader vijay wadettiwar reaction on ashok chavan resign from congress party rbt 74 css
Show comments