लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपींची पाठराखण कोणीही करू नये. गुन्हेगाराला जात, धर्म, पंथ नसतो त्यामुळे साधू, संत महंतांनी देखील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली तर त्यांचे श्रेष्ठत्व दिसले असते अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

संतोष देशमुख प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे योग्य नाही. गुन्हेगार आमच्या समाजाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घाला असे सगळेच म्हणायला लागले तर कायदा आणि सुव्यवस्था राज्यात उरणार नाही. सरपंच देशमुख यांची हत्या ही भयावह घटना आहे. त्यामुळे आरोपींना पाठीशी घालणारे नालायक ठरतील अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर येथे आज पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यात शेतकरी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, कंत्राटदार यांचा निधी प्रलंबित आहे. विदर्भात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना ३८६ कोटींचा मदतीचा प्रस्ताव सरकारकडे गेले सहा महिने धूळ खात पडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांकडून धान, सोयाबीन खरेदी केली तरी त्यांना पैसे देण्यात आले नाही, अंगणवाडी सेविका असतील निराधार योजनेचे पैसे देण्यात आलेले नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारानी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी विद्यार्थांना देखील निधी मिळत नाही त्यामुळे सरकार नेमकी काय काम करत आहे असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. इतके बहुमत मिळून ही जर विविध घटकांना त्यांचे पैसे मिळत नसतील तर हे सरकार अस्थिर असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.