चंद्रपूर : संधी मिळाल्यास लोकसभा निवडणुकीची तयारी करणार, मात्र पक्ष सोडणार नाही. पक्षातीलच काहींनी माझ्या पक्षांतराचा विषय प्रसारमध्यमापर्यंत पोहोचवला. मात्र हे पूर्णतः खोटे आहे. मी काँग्रेसचा खरा शिपाई आहे आणि भविष्यातही राहील. सत्तेसाठी जे पक्ष सोडून गेलेत त्यांची आज काय गत झाली, हे सर्वश्रूत आहे, असे मत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस समितीच्यावतीने आयोजित सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, डॉ. देविदास जगनाडे, सेवादलाचे गुडेवार, आदी उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना व महाविकास आघाडीतील काही उणिवांमुळे काँग्रेसचा पराभव झाला. ब्रह्मपुरीत आयोजित कुणबी समाजाच्या मेळाव्यात काहींनी मुक्ताफळे उधळली. पक्ष कोणताही असो, कुणबी समाजाचा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन या नेत्यांनी केले. यामुळेही विदर्भात काँग्रेसचे नुकसान झाले. सत्ताधाऱ्यांना सत्तेत आल्यानंतरही विश्वास बसेना, अशी परिस्थिती निवडणुकीनंतर होती. सत्ताधाऱ्यांच्या या अनपेक्षित यशावर आजही शंकाकुशंका व्यक्त होत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
महागाई, बेरोजगारीमुळे संपूर्ण राज्य दिवाळखोरीत निघाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून राज्यात प्रचंड लूट सुरू आहे. मी वारसाने नाही, तर संघर्षातून पुढे आलो व राज्याच्या सत्तेत तसेच विरोधी बाकावरून जनसेवा करू लागलो. आज विरोधी बाकाच्या पहिल्या रांगेत बसून मी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे नाव उंचावले, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.तत्पूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सुधाकर पोपटे, तर प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी केले. शहराध्यक्ष हितेंद्र राऊत यांनी आभार मानले.
९० कोटींच्या वाळूसाठी काहींचा भाजप प्रवेश
स्वस्वार्थ व अर्थकारणामुळे विलास विखार व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही कार्यकर्ते वाल्मीक कराड याच्याप्रमाणे वागू लागतात, असे सांगत गोसीखुर्द प्रकल्पाला लागणाऱ्या ९० कोटींच्या वाळूसाठी काहींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. तळ्यात आणि मळ्यात अशी दुहेरी भूमिका वठवणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान नाही. जो कार्यकर्ता एकनिष्ठेने कार्य करेल, त्याचाच पक्ष आदर व सन्मान करेल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.