चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे (विमाशि) उमेदवार सुधाकर अडबाले यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गटागटात विभागलेले काँग्रेसचे नेते अडबाले यांना निवडणुकीत मदत करतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नागपूरची जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली आहे. नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ‘विमाशि’चे सुधाकर अडबाले यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे. माजी मंत्री, आ. विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे तथा पदवीधर मतदारसंघाचे आ. ॲड. अभिजीत वंजारी, असे चार आमदार व एक खासदार आहेत. चारही नेते काँग्रेसचेच असले तरी त्यांचे वेगवेगळे गट आहेत.

हेही वाचा >>> हिंदूंना फसवणाऱ्यांचे समर्थन करणार का?, गृहमंत्री फडणवीसांना अंनिसचा थेट सवाल

वडेट्टीवार-धानोरकर-धोटे असे स्वतंत्र गट येथे कार्यरत आहेत. तिन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यक्रमात, मोर्चे आंदोलनात सहभागी होत नाही. माजी खासदार नरेश पुगलिया यांचा स्वतंत्र गट विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या रूपाने कार्यरत आहे. अशा स्थितीत ‘विमाशि’चे अडबाले यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांच्या विजयासाठी हे सर्व नेते प्रयत्न करतील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. केवळ चंद्रपूरच नाही तर लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातदेखील काँग्रेस पक्ष गटातटात विखुरलेला आहे. या सर्व नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान अडबाले यांच्यासमोर आहे.

हेही वाचा >>> नागपूर : ‘ती’ मोबाईलला हेडफोन लावून बोलत रुळ ओलांडत होती आणि…

अडबाले वडेट्टीवार व धानोरकर या दोन्ही नेत्यांच्या जवळचे मानले जातात. पक्षाचा आमदार निवडून आलाच पाहिजे, पक्ष मजबूत झालाच पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेसचा आणखी एक नवीन आमदार निवडून आणून नवे दुकान कशाला सुरू करायचे, अशी मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आजवर राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका अशा अनेक निवडणुकांमध्ये याचा अनुभव आला आहे.

यामुळे काँग्रेसने अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी काँग्रेसने नेते त्यांना मदत करणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. तिकडे नागपुरात माजी आमदार आशीष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना समर्थन दिल्याने हा घोळ आणखी चिघळला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leaders help sudhakar adbale challenge to bring together leaders of chandrapur gadchiroli district rsj 74 ysh