लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पुढील मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे. रविवारी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भातून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील व पटोले हेच मुख्यमंत्री होतील, अशी भूमिका उघडपणे मांडली.

काँग्रेसची नागपूर विधानसभा आढावा बैठक रविवारी रजवाडा पॅलेस येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे प्रदेश उपप्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडली. लोकसभेत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले होते. विधानसभेत ते राज्यात करिष्मा करतीलच. मात्र, विदर्भात सर्वात जास्त जागा जिंकून देतील व तेच मुख्यमंत्री असतील, असा विश्वास काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी व्यक्त केला. अतुल लोंढे, अभिजित वंजारी, अनीस अहमद यांनी हा मुद्दा मांडला व नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांनीदेखील याला दुजोरा दिला. दरम्यान, अद्याप महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नसला, तरी नागपुरातील सहाही जागांवर काँग्रेसचेच उमेदवार लढतील, असादेखील नेत्यांचा सूर होता.

आणखी वाचा- नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”

…तर मुख्यमंत्रिपद खेचून आणू

नाना पटोलेंनी मेहनत घेतली, विधानसभा अध्यक्षपद सोडून संघटनेचे पद घेतले, दारोदारी फिरले, राज्यात फिरले आणि काँग्रेसला चांगले दिवस आले. नाना पटोलेंमुळे हे यश मिळाले असून त्याचे बक्षीस त्यांना द्यायला हवे. नाही मिळाले तर विदर्भवाले हिसकावून घेऊ. जो मेहनत करेल त्याला फळ मिळायला हवे, ती लढाईही आपल्याला लढावी लागेल असे सांगत विकास ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले.

नागपुरातील सहा जागा जिंकण्याचा निर्धार

२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर नागपूर विधानसभेत काँग्रेस चार जागांवर विजयी होईल हे सांगितले हाेते. दोन जागा थोडक्यात हरलो. आता २०२४ च्या लोकसभेनंतर विकास ठाकरेंचे मताधिक्य वाढले आहेत. नागपूरकर जनतेच्या मनात प्रचंड चिड असल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस नागपूरच्या सहाही जागांवर विजय मिळवेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली.

आणखी वाचा-Amravati Accident Update : मेळघाट बस अपघातात सहा जणांचा मृत्‍यू

काँग्रेसच आपल्या उमेदवाराचा पराभव करते

नागपूर आणि विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा गड आहे. आम्हाला कुणीही हरवू शकत नाही. मात्र, आमच्यातील अंतर्गत भांडणामुळे काँग्रेसचे लोकच आपल्या उमेदवाराला हरवतात अशी खंत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. आता आमच्या पक्षात कुठलीही भांडणे नाहीत असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leaders in nagpur claimed that state president nana patole will be the next chief minister dag 87 mrj