नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवार निश्चित करताना पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्याचा सपाटा लावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील इतर घटक पक्षाच्या तुलनेत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याने पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या सर्वच जिल्ह्यात अधिक आहे. एका-एका मतदारसंघात चार किंवा पाच नावे पुढे आली आहेत. पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाईल, पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नाना पटोले यांनी जाहीर केले होते. प्रदेश काँग्रेसने उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली आहे. त्यावर नाना पटोले यांचा वरचष्मा असल्याचे समजते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलेल्या, शिफारस केलेल्या नावांचाही विचार न केल्याने काँग्रेसमधील अनेक प्रमुख नेते नाराज असल्याची माहिती आहे. काही मतदारसंघाबाबत पटोले यांनी स्वमर्जीने निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा – कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पूर्व विदर्भातील विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, पश्चिम विदर्भातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांचा-त्याच्या भागात प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील केदार यांनी रामटेक, वडेट्टीवार यांनी गडचिरोली, थोरात यांनी नगर, यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची जागा जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीतही रामटेक, जालनासह अन्य काही उमेदवारांच्या नावांवर असहमती दर्शवली होती, त्यांच्या प्रचारातही सहभाग मोजक्याच स्वरूपाचा होता, याकडे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले. हीच स्थिती आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही आहे. पटोले स्वतंत्रपणे निर्णय घेत सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. विदर्भातील अनेक जागा वाटप अद्याप निश्चित झाले नाही. काही उमेदवारांच्या बाबतही तिढा कायम आहे. सर्व नेत्यांनी एकत्र बसून उमेदवार निश्चित करावे, अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून होत आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

हेही वाचा – नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी, सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न

दोन माजी मुख्यमंत्र्यांकडे विदर्भाची जबाबदारी

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भाकडून अपेक्षा आहे. त्यामुळे येथून अधिकाधिक जागा मिळाव्या यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, नेत्यांमधील समन्वय आणि अन्य बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीने विदर्भासाठी दोन विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा समावेश आहे.