चंद्रपूर: नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर यासह विदर्भातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी बाजार समिती निवडणुकीत विजयी झाली आहे. देशात व राज्यातील वातावरण पूर्णपणे भाजपच्या विरोधात असून शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना आज त्यांची खरी जागा दाखवली आहे, भाजपला नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

बाजार समिती निवडणुकी निकालानंतर वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस व महविकास आघाडीने भाजपला पराभवाची धूळ चारली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसोबत चंद्रपुरातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या सर्व समित्यांवर काँग्रेसप्रणित पॅनेलचे एकहाती वर्चस्व मिळवले आहे. चंद्रपुरातील ९ पैकी तब्बल ७ बाजार समित्यांवर काँग्रेसप्रणित पॅनलचा एकतर्फी विजय झालेला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांची निवडणूक ही माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही बाजार समितीवर मोठा विजय मिळवला आहे.

Story img Loader