नागपूर: राजकारणात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाच करायची असते असा अलिखित नियमच झालेला आहे. इच्छा असतानाही ते सत्ताधाऱ्यांचे सार्वजनिक ठिकाणी कौतुक करू शकत नाही. सत्ताधारी भाजप असेल व विरोधक जर काँग्रेसचा नेता असेल तर त्यांच्याबाबत असे घडणे अलीकडच्या काळातील अशक्यप्राय आहे.

मात्र नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार डॉ. संजय मेश्राम त्याला अपवाद ठरले. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोकळ्या मनाने स्तुती केली. नागरिकांच्या तत्पर्तेसाठी फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे,असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेवा क्षेत्राची उत्तम जाण आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ज्या काही सुधारणा आवश्यक वाटतात त्यासाठी त्यांनी केलेले बदल व सेवा हक्क अधिनियमासंदर्भात घेतलेला पुढाकार हा त्यांच्या सेवा क्षेत्रातील कटिबध्दतेचे प्रतीक आहे या शब्दात आमदार संजय मेश्राम यांनी फडणवीस यांचा गौरव केला. काही वर्षांपूर्वी बास्केटबॉल संघटनेचे काम करतांना त्यांच्या सेवा क्षेत्राबाबत असलेल्या तळमळीचा मला प्रत्यय असल्याचे त्यांनी मोकळेपणाने सांगितले.

प्रशासनात अधिकारी होण्यासाठी केवळ एकवेळा परीक्षा दिली की निवृत्तीपर्यंत विविध पदांवर अधिकाऱ्यांना रहाता येते. लोकप्रतिनिधींना मात्र रोज परीक्षा द्यावी लागते. शासनातर्फे ज्या काही हक्काच्या सेवा आहेत त्याबाबत आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. अधिनियमानूसार प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या चांगल्या सेवेचा प्रत्यय नागरिकांना द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.