जयपूरहून परतलेल्या काँग्रेस आमदारांचा निर्धार
कुठल्याही परिस्थितीत आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहू. कितीही दबाव आणि आमिष दाखवले तरी पक्षात फूट पडणार नाही, असा निर्धार व्यक्त करतानाच पक्षाने ठरवल्यास सेनेच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये सहभागी व्हावे, यासाठी आमदार अनुकूल असल्याचा दावा जयपूरहून परतलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले. मात्र, वितुष्ट आल्यावर महायुतीत बेबनाव झाल्याने सरकार स्थापनेचा घोळ निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्या आमदारांना जयपूर येथे ८ नोव्हेंबरला बोलावून घेतले होते. तेव्हापासून सर्व आमदार जयपूरला मुक्कामी होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर काँग्रेसने सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात परत जाण्याची सूचना केली.
उमरेड येथून पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार राजू पारवे म्हणाले, जयपूर येथील पाच-सहा दिवसांच्या वास्तव्यात असे लक्षात आले की, काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार पक्षनिष्ठ आहेत. त्यांना फोडणे अशक्य आहे. प्रत्येक आमदाराने शिवसेनेशी मिळून सरकार स्थापन करावी, अशी भूमिका मांडली. या पाच दिवसांत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रत्येक आमदाराला त्यांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली. नवनिर्वाचित आमदारांची सत्तेत सहभागी होण्याची कणकर भूमिका होती. शिवाय पक्षश्रेष्ठींनी देखील ती मान्य केली.
साकोलीचे आमदार व पक्षाचे नेते नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचा प्रत्येक आमदार प्रतिकूल परिस्थिती आणि भाजपचे आव्हान मोडून निवडून आले आहे. ते भाजपसोबत जाणे शक्य नाही. त्यामुळेच भाजपने सरकार स्थापनेचा दावा सोडला, पण काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे धाडस केले नाही. साकोलीमध्ये सर्वानी बघितले काय झाले. भाजपने त्यांचे अंतिम शस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील वापरले. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. नवनिर्वाचित आमदारांना त्यांची भूमिका मांडता यावी म्हणून जयपूरला एकत्र बोलावले, असा दावाही पटोले यांनी केला.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा समावेश असलेले सरकार येणार आहे. याचा काँग्रेसच्या आमदारांना विश्वास आहे. त्यामुळे सर्व आमदार निश्चिंत असून जयपूरहून परतल्याबरोबर आपापल्या मतदारसंघात कामाला लागले आहेत. आम्हाला मध्यावधी होणारा नाही याचा विश्वास आहे, असे पश्चिम नागपूरचे नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे म्हणाले. नारायण राणे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, काँग्रेसचे आमदार फोडण्याइतपत राणेंची ताकद नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन स्वत:चे महत्त्व वाढण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला.
सावधगिरीसाठी जयपूरची निवड
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होईल म्हणून पक्षाने सर्व आमदारांना पाच दिवस जयपूरमध्ये ठेवले होते. मधल्या काळात काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र, जयपूरला आमदार गेल्यावर एकाही आमदाराशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधला नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले.