वर्धा : लाडकी बहिण योजनेवर विरोधकांनी भरपूर टिका केली. ही योजना टिकणार नसून निवडणूक झाल्यावर ती बंद केली जाईल, असाही विरोधकांचा आरोप राहिला. मध्यप्रदेशात ही योजना बंद करण्यात आल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हणताच गदारोळ उडाला होता. आता तसेच झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवळीचे आमदार व काँग्रेसचे उमेदवार रणजीत कांबळे यांनी लाडकी बहिण योजना मध्यप्रदेशात बंद झाल्याचे मत प्रचारादरम्यान एका सार्वजनीक कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच या योजनेसाठी लागणारे ४२ हजार कोटी रूपये आणणार कुठून असा सवाल करीत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तात्पुरत्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र आमदार रणजीत कांबळे यांच्या या टिकेची भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी तात्काळ दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. त्यात ते म्हणतात की आमदार कांबळे यांनी खोटे विधान करीत जनतेला चुकीची माहिती दिली. मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेली लाडकी बहिण योजना बंद करण्यात आल्याचा त्यांचा दावा खोटा आहे.

हेही वाचा : भाजपच्या ‘या’ आमदारच्या संपत्तीत तब्बल १०२ कोटींनी वाढ…

खोट्या माहितीच्या आधारे जनतेत गैरसमज निर्माण करणे व लोकांची दिशाभूल करणे हा अत्यंत गंभीर व निंदनीय प्रकार आहे. खोट्या प्रचाराद्वारे जनतेत असंतोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक शांतता बिघडविण्याचा व लोकांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा हा प्रकार धोकादायक ठरतो. अश्या प्रकारास भाजपने कधीच समर्थन दिले नाही.

आमदार रणजीत कांबळे यांनी राजकीय फायद्यासाठी खोट्या प्रचाराचे हत्यार वापरले आहे. म्हणून आमदार कांबळे यांच्या विरोधात खोट्या विधानाबाबत तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी. याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी. कारण खोट्या प्रचारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून समाजातील कोणतीही व्यक्ती भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष गफाट यांनी पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रारीबाबत बोलतांना जिल्हाध्यक्ष गफाट म्हणाले की मी केलेल्या तक्रारीवर निवडणूक कार्यालय चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर पोलीस कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार.

हेही वाचा : नागपूर पोलीस आयुक्तांच्याच नावे बनावट फेसबुक खाते

वादग्रस्त विधानाने आमदार रणजीत कांबळे यापूर्वीही चर्चेत राहले आहे. त्यांचे काही जुने व्हिडिओ आता पुन्हा प्रचारात आले आहे. यापूर्वी त्यांनी आरोग्य अधिकारांना फोनवरून धमकावल्याने तक्रारी झाल्या होत्या.