अमरावती : मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेच्‍या विधानसभा क्षेत्रनिहाय समित्‍यांवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचा वरचष्‍मा असताना अमरावतीत मात्र ही संधी काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके यांना मिळाल्‍याने राजकीय वर्तुळात त्‍याची चांगलीच चर्चा रंगली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून अमरावतीचे तहसीलदार, महापालिका आयुक्त, दोन बाल विकास प्रकल्प अधिकारी, तसेच दोन अशासकीय सदस्य यांचा समावेश आहे. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाचे नेते आहेत. सुलभा खोडके यांच्‍या नियुक्‍तीला हा आधार असला, तरी यातून आगामी निवडणुकीच्‍या दृष्‍टीने महायुतीतील इतर घटक पक्षांना स्‍पष्‍ट संकेत मिळाले आहेत. शहरातील भाजपच्‍या नेत्‍यांना डावलून सुलभा खोडके यांची समितीच्‍या अध्‍यक्षपदी झालेली नियुक्‍ती त्‍यामुळेच चर्चेचा विषय बनली आहे.

हेही वाचा…RSS Chief Mohan Bhagwat : “बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी,” सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

गेल्‍या महिन्‍यात विधान परिषदेच्‍या ११ जागांसाठी झालेल्‍या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. त्‍यात सुलभा खोडके यांच्‍या नावाचीही चर्चा झाली. सुलभा खोडके यांनी मात्र, मी काँग्रेससोबत आहे, काँग्रेससोबतच राहणार असून काँग्रेसलाच मतदान केल्‍याचे सांगत त्यांच्याबाबत सुरू असलेली चर्चा निराधार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते. गेल्‍या काही वर्षांपासून काँग्रेसच्‍या स्‍थानिक राजकारणापासून दूर लोटण्‍याचे प्रयत्‍न सुरू असून आपले मत फुटल्‍याची चर्चा हा त्‍याच षडयंत्राचा एक भाग असल्‍याचा आरोपही सुलभा खोडके यांनी केला होता.

हेही वाचा…लोकजागर: फुकाचा कळवळा!

सुमारे दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यादरम्यान सुलभा खोडके यांना निमंत्रण नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्‍या स्‍थानिक पातळीवरील बैठकांना सुलभा खोडके यांना निमंत्रित केले जात नव्‍हते, स्‍थानिक पदाधिकारी आणि नेत्‍यांकडून अवहेलना होत असल्‍याचा आरोप सुलभा खोडके यांनी त्‍यावेळी केला होता. बुधवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्‍नीथला यांच्‍या उपस्थितीत पार पडलेल्‍या विधानसभा निवडणूक आढावा बैठकीतही सुलभा खोडके यांना निमंत्रित करण्‍यात आले नव्‍हते. त्‍यामुळे आता त्‍यांची पुढील काळातील भूमिका काय राहणार, हा प्रश्‍न चर्चेत आला आहे.