भर दुपारची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी
नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महानिर्मितीच्या कोराडीतील प्रस्तावित १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यापाठोपाठ आता काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनीही प्रकल्पाला विरोध करत २९ मे रोजीची भर दुपारची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना विकास ठाकरे यांनी निवेदन दिले. कोराडीच्या प्रकल्पात सध्या ६६० मेगावॅटचे ३ संच कार्यान्वित आहे. हे लावतांना महानिर्मितीने प्रदुषण कमी करण्यासाठी फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (एफजीडी) लावले नाही. त्यामुळे नागरिकांना प्रदुषणाच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. कोराडीतील पूर्वीच्या वीज निर्मिती संचावर एफजीडी लावल्याशिवाय नवीन संच लावू नये. असे ठाकरे यांनी पत्रात नमुद केले आहे.
हेही वाचा >>>नागपूर: युपीएससीमध्ये उपराजधानीतील विद्यार्थ्यांचा झेंडा; चार उमेदवारांनी मारली बाजी
दरम्यान २९ मे रोजी भर उन्हात १२.३० वाजता जनसुनावणी आयोजित केली आहे. सध्या शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. नागरिकांना उष्णाघाताचाही धोका बघता या जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.