यवतमाळ : राज्यातील शेतकरी सिंचन, वीज, प्रतिबंधित बियाणे, यामुळे हवालदिल झाला असताना राज्याचे कृषिमंत्री परदेशात सुट्टी घालवायला गेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाशी काहीही घेणे देणे नाही. मुळात त्यांना शेतीप्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण नाही. त्यांना लाल आणि हिरव्या मिर्चीतील फरक तरी कळतो का, अशी बोचरी टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पाणीटंचाईसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार ठाकूर बोलत होत्या. शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे राज्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली, असा आरोप ठाकूर यांनी यावेळी केला. काँग्रेस आमदारांची एक समिती तयार करून अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील पाणीटंचाईचा अहवाल तयार करण्यात आला. सोमवार, ३ जून रोजी हा अहवाल अमरावती येथे विभागीय आयुक्तांना सुपूर्द करण्यात येईल आणि तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जाईल, असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा >>> बुलढाणा : तीनशे गावांत पाणीटंचाई, साडेतीन लाख ग्रामस्थांची होरपळ

शासनाची अमृत पाणीपुरवठा योजना फसल्याने यवतमाळात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अमृत योजनेमुळे जनतेला पाणी मिळालेच नाही, मात्र विविध अडचणी निर्माण झाल्या. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले जलजीवन मिशनही सध्याच्या सरकारने डबघाईस आणले, असा आरोप त्यांनी केला. सर्वच योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अधिक जागा निवडून येतील, असा विश्वासही ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. पाणीटंचाई संदर्भात दौरा असल्याने अधिक राजकीय भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, प्रवक्ते दिलीप एडतकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> नाना पटोले म्हणतात, “४ जूननतंर शिंदे आणि अजित पवार गट राहील की नाही…”

कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक

कृत्रिम पाणीटंचाईसोबतच विजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळेही सर्वसामान्य हवालदिल झाले आहे. घरात आणि शेतातही राहू शकत नाही, अशी अवस्था झाली आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. वीज राहत नसल्याने पाणीपुरवठा होत नाही. परप्रांतातून प्रतिबंधित बियाणे जिल्ह्यात आणून विकले जात आहे. मात्र, यावर कृषी विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असे त्या म्हणाल्या. सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शासन केवळ राजकारण करत असल्याने जनता वाऱ्यावर असल्याची टीका ठाकूर यांनी यावेळी केली.