अकोला : काँग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेला ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवींचे बळ मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी पदयात्रेशी जुळणार आहेत. जिल्ह्यातील पातूर येथे राहुल गांधींची पदयात्रा आज, १६ नोव्हेंबरला सायंकाळी दाखल होईल. यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. खा. राहुल गांधी बुधवारी सायंकाळी यात्रेसह वाशीम जिल्ह्यातून पातूर येथे दाखल होतील. यात्रेचा जिल्ह्यात ४५ कि.मी. चा प्रवास राहणार आहे. यादरम्यान खा. गांधी विद्यार्थी, कामगारांसह विविध संघटनांशी चर्चा करणार आहेत. राहुल गांधींच्या पदयात्रेला समर्थन देऊन त्यात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवी अकोल्यात दाखल होणार आहेत. पातूर येथून यात्रेमध्ये आपल्या ५०० समर्थकांसह नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, महात्मा गांधींचे पणतू तथा ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर आदी सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली.

Bharat Jodo Yatra : सोनिया गांधींच्या उपस्थितीत शेगावात काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार; आतापर्यंतच्या सर्व सभांचे विक्रम मोडणार – नाना पटोले

यात्रेचा १६ नोव्हेंबर रोजी रात्री पातूर येथे मुक्काम राहणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी पातूर येथून यात्रा बाळापूरकडे रवाना होईल. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी यात्रा कुपटा येथील जि.प. शाळेतून बुलढाणा जिल्ह्यात रवाना होणार आहे. शेगाव येथे १८ नोव्हेंबरला खा. राहुल गांधी यांची सभा होईल. या सभेत पाच लाख नागरिक उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

हेही वाचा: भाजपचे संविधानावरच आक्रमण!; राहुल गांधी यांची टीका; भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल

वनक्षेत्रातून मोटारीने प्रवास
वन विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या मार्गावरील काँग्रेस नेते खा. राहुल गांधींचा ‘भारत जोडो’ यात्रेतील प्रवास मोटारीने (कार) राहणार आहे. या क्षेत्रात यात्रेमुळे पर्यावरण हानी व वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून राहुल गांधींनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. सुरक्षेचे कारण देखील पुढे आले आहे. वाशीम जिल्ह्यातील मेडशी ते पातुरपर्यंतचा १६ कि.मी.चा टप्पा राहुल गांधी वाहनाद्वारे पार करतील. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा एक टप्पा ते वाहनाद्वारे पूर्ण करणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp rahul gandhi bharat jodo yatra will enter akola district today tmb 01