Bunty Shelke Video Viral: २० नोव्हेबंर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी राज्यात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. केंद्रातले नेते, इतर राज्यातले नेते सध्या महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. तर उमेदवारही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विदर्भात यंदा काँग्रेस आणि भाजपा असा सामना रंगला आहे. मागच्या दोन निवडणुकांत विदर्भात भाजपाने यश मिळविले होते. मात्र आता विदर्भावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. अशातच नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके हे पळत पळत भाजपा कार्यालयात घुसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ खुद्द बंटी शेळके यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर टाकला आहे.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंटी शेळके आणि भाजपाचे प्रवीण दटके यांच्यात थेट लढत होत आहे. काल सायंकाळी बंटी शेळके प्रचार करत असताना ते अचानक भाजपाच्या संपर्क कार्यालयात पळत पळत गेले. त्यांनी कार्यालयात अचानक प्रवेश करत तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करत त्यांना मिठ्या मारल्या. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीर्वाद घेतले आणि काही मिनिटांत ते तिथून आपल्या प्रचारासाठी निघून गेले. बंटी शेळके यांच्या अचानक केलेल्या कृतीमुळे भाजपा कार्यकर्तेही थोडे चक्रावले, पण त्यांनीही बंटी शेळके यांना शुभेच्छा दिल्या.
बंटी शेळके यांनीच हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर टाकला आहे. तसेच हिंदीत व्हिडीओला कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले, “माझी लढाई कुणा व्यक्तीबरोबर नाही तर विचारांशी आहे. फक्त नागपूर मध्य नाही तर संपूर्ण नागपूर शहरातील कोणताही व्यक्ती असो, तो कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा असो, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा संकल्प आहे की, मी प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध राहू.”
कोण आहेत बंटी शेळके?
लोकहितासाठी संघर्ष करण्याचा वडिलांकडून मिळालेला वारसा पुढे नेत व पुढे राजकारणात प्रवेश करून युवक काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अशी वाटचाल करणारे काँग्रेस नेते बंटी शेळके पक्षाचे नागपुरातील तरुण नेतृत्व म्हणून मागील काही वर्षांत नावारूपास आले आहेत. यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविकाप्राप्त ४५ वर्षीय बंटी शेळके यांचे वडील बाबा शेळके काँग्रेस विचारसरणीचे. ते त्यांच्या ‘घंटानाद’ या संघटनेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नावर आंदोलन करीत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत बंटी शेळके यांनीही लोकांच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासनाशी दोन हात करण्याची भूमिका घेत आंदोलने सुरू केली.
© IE Online Media Services (P) Ltd