शेतमालाला दरवाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस साहेब…आम्ही पाकिस्तानात हनुमान चालिसा पठण करायचे काय? नागपुरात संतप्त आंदोलकांचा सवाल

मागण्यांची पूर्तता होइपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर केलेल्या पोलीस अत्याचाराचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पत्रकातून तोफ डागली. भाजप सरकारच्या काळात खते, बी-बियाणे, डिझेल महाग झाल्याने शेती करणे परवडत नाही. यावर्षीही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी, कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. पण पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांनाही पोलिसांनी अडवले.

हेही वाचा >>> महापालिका निवडणूक लांबल्‍याने इच्‍छुकांमध्‍ये अस्‍वस्‍थता

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे लोकशाही असलेल्या राज्यात गुन्हा आहे का? लाठीचार्ज करण्याची काय गरज होती? असा सवाल पटोले यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारची ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. पोलीस अत्याचारातील दोषींना शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही पटोले यांनी नमूद केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole slams shinde fadnavis government over lathi charge on protesting farmers scm 61 zws