लोकसत्ता टीम

नागपूर : भाजपला सत्तेतून हटवणे एवढेच महाविकास आघाडीचे लक्ष आहे. आता यावर कुठलीही चर्चा होणार नाही. निवडणूक निकालानंतरच महाविकास आघाडी त्या संदर्भात चर्चा करेल, असे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी नागपूरमध्ये सांगितले.

पूर्व विदर्भातील पक्षाची आढावा बैठक चंद्रपूर येथे आयोजित केली आहे. तेथे जाण्यासाठी चेन्नीथला नागपूरमध्ये आले होते. विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चेन्नीथला म्हणाले, सरकार बनवने एवढंच आमचे उद्दिष्ट आहे. या निवडणुकीत कोणीच लहान भाऊ नाही, अन् मोठा भाऊ नाही. या निवडणुकीत अनेक छोट्या पार्टी आहे. या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

आणखी वाचा-नागझिराचा राजा ‘बाजीराव’पाठोपाठ आणखी एका वाघाचा मृत्यू

तिरुपती मंदिर लाडू प्रकरण

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूमध्ये भेसळीचा मुद्दा सध्या गाजत आहे. हा गंभीर प्रकार आहे. लोक श्रद्धने मंदिरात जातात. त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे चेन्नीथला म्हणाले.

निवडणूक सर्वेक्षण

संपूर्ण महाराष्ट्र सत्ता परिवर्तन जनतेला अपेक्षित आहे. पण आयोग जाणीवपूर्वक निवडणुका जाहीर करीत नाही. वन नेशन वन इलेक्शनवर बोलणारे लोक हरियाणा जम्मू-काश्मीरसोबत महाराष्ट्रात निवडणूका का घेत नाही? महाराष्ट्रात काय सुरू आहे. लवकरात लवकर निवडणुका घोषित झाल्या पाहिजे. जनता सत्ता परिवर्तन करून महाविकास आघाडीला समर्थन देईल, असे चेन्नीथला म्हणाले.

आणखी वाचा-स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…

जागा वाटपासाठी चर्चा सुरू

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे येणाऱ्या काही दिवसात सर्व पक्षाचे लोक अंतिम निर्णय करतील. विदर्भ काँग्रेसचा गड आहे. इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसच्या सोबत राहिलेला आहे. यावेळी सुद्धा राहील. लोकसभेतही विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे. जागावाटपाच्या वेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊ, असे चेन्नीथला म्हणाले.

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. त्यापैकी किमान ४५ ते ५० जागा काँग्रेसला मिळाव्या, अशी मागणी काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसला ४५ जागा दिल्यास उरलेल्या १७ जागांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात विभागणी करण्यात येईल.ती वरील दोन्ही पक्षांना मान्य होणार का असा प्रश्न आहे.