सत्तेत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि विरोधात असताना सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर लक्ष ठेवून त्याचे अधिकाधिक भांडवल करण्याची भाजपची रणनीती आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अंगिकारली असल्याचे दिसून येते. केंद्रातील मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खुले आव्हान देत देशभर फिरत असलेल्या कन्हैयाकुमारच्या सभेला नागपुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार यांच्या हजेरीने हेच दिसून आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही दिल्लीत कन्हैया कुमारची भेट घेतली होती. नागपुरातीलही त्याच्या सभेला स्थानिक नेते उपस्थित होते. कन्हैयाने उपस्थित केलेले मुद्दे युवकांना भावल्याने त्याला देशभरातून समर्थन मिळू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्याने केलेल्या टीकेमुळे विरोधी पक्षालाही तो आपला वाटू लागला. त्याच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत आपली राजकीय पोळी शिजवण्यासाठी आता नागपुरात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेतेही पुढे सरसावले आहे,असे गुरुवारी झालेल्या सभेच्या निमित्ताने दिसून आले. या सभेला काँग्रेसचे सरचिटणीस प्राचार्य बबन तायवाडे यांनी या सभेला सभागृह उपलब्ध करून दिले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रफुल गुडधे यांनी सभेला हजेरी लावली. या सभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांचे समर्थन दिले होते.
विरोधी पक्षात असताना भाजपने देखील असेच उद्योग केले होते. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधात जे कुणी उभे राहतील, त्यांना रसद पुरवण्याचे काम भाजपने केले होते. बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाच्या विरोधात दिल्लीतील रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलनाला भाजप आणि रा.स्व.संघाच्या विचारसरणीला मानणाऱ्या संघटनांनी छुपा पाठिंबा दिला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्यासाठी केलेल्या उपोषण आंदोलनाला भाजप आणि समर्थित संघटनांनी खतपाणी घातले होते. याशिवाय दिल्लतील निर्भया प्रकरणात देशात महिला सुरक्षित नसल्याचे वातारण निर्मिती करण्यासाठी याच पक्षांचा मोठा वाटा होता. समाजमाध्यमातून भाजप आणि त्यांच्या संघटनांनी सरकार विरोधी प्रचाराचे टोक गाठले होते. या धोरणाचा अवलंब आता काँग्रेस, राष्ट्रवादी करू लागल्याचे दिसून येत आहे. मात्र मार्क्सवादी, डाव्या विचाराशी बांधीलकी सांगणाऱ्या कन्हैयाकुमार याच्या सभेला उपस्थितीत दर्शविण्याचे वेळ काँग्रेसवाल्यांवर आली आहे. जनमत गमावलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्ताधाऱ्यांना नामोहरण करण्यासाठी डाव्यांची मदत घ्यावी लागत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा