भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत राजकीय फासे कसे पडतात, यावर सारे अवलंबून आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राष्ट्रवादी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाकडे शब्द टाकण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, राष्ट्रवादीला धडा शिकविण्याकरिता जिल्हा परिषदेच्या धर्तीवरच या निवडणुकीतही काँग्रेस अखेरच्या टप्प्यात भाजपच्या पदरात मते टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मतदारसंघातून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतर्फे विद्यमान आमदार राजेंद्र जैन, भाजपतर्फे नागपूरचे परिणय फुके आणि काँग्रेसतर्फे पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल्ल अग्रवाल रिंगणात आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत. सेनेचा भाजपने पाठिंबा गृहीत धरला आहे. आतापर्यंतचा या निवडणुकीतील इतिहास पाहिला तर युती आणि आघाडी फक्त कागदावर राहिली असून, मतदान करताना मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार झाला आहे. यंदाही यापेक्षा वेगळे चित्र नाही. सुरुवातीला मतदारांना ‘टोकन’ देण्यात आले आहे. मतदानानंतर बाकीचे ‘हिशेब’ केले जाणार आहेत. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्याने उमेदवारांची काहीशी पंचाईत झाली. तरीही रिंगणात असलेले उमेदवार सर्वच दृष्टीने ‘भक्कम’ असल्याने दिलेला ‘शब्द’ पाळला जाईल याबाबत सर्वाना आश्वासन दिले जात आहे. सध्या सर्व मतदार हे वेगवेगळ्या गटांत अज्ञातस्थळी सहलीला गेले आहेत. ते १८ तारखेला रात्री मतदानस्थळी दाखल होतील.
प्रफुल्लभाईंची प्रतिष्ठा पणाला
भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नाना पटोलेंनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा पराभव झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता संपादनासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता, पण गोंदियामध्ये काँग्रेसचे गोपाळ अगरवाल अडून बसले. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संधान साधून भाजपच्या मदतीने सत्ता संपादन केली. विधान परिषद निवडणुकीतही आपल्या पुत्राला रिंगणात उतरविले असले तरी अगरवाल यांचे एकच लक्ष्य आहे व ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना शह देणे. प्रफुल्लभाई स्वस्त बसणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात येऊन गेले. मोदी आणि शरद पवार यांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीतील नेत्यांचे उत्तम संबंध लक्षात घेता, पडद्याआडून काही तडजोडी होतात का, हा कळीचा मुद्दा राहणार आहे.
अग्रवाल हुकमी एक्का?
गोपाळ अगरवाल हे प्रफुल्ल पटेल यांना मदत करणार नाहीत हे स्पष्ट आहे. स्वबळावर विजयाचे गणित जुळत नसल्यास आपली काही मते भाजपच्या पारडय़ात टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास भाजपच्या फुके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दुसरीकडे काँग्रेसमधील काही नाराजांना पटेल यांनी गळाला लावल्याचीही चर्चा आहे.
तिन्ही उमेदवार आर्थिकदृष्टय़ा तगडे आहेत. मुख्यमंत्र्यांचा विश्वासू सहकारी रिंगणात असल्याने सारे चित्र बदलू शकते. राष्ट्रवादीने जळगाव, यवतमाळ, नांदेड या तीन मतदारसंघांमध्ये भाजप वा शिवसेनेला मदत करण्याचे ठरविले आहे. या बदल्यात भंडारा-गोंदिया आणि सातारा-सांगलीत मदत व्हावी, अशी अपेक्षा आहे. दिल्लीच्या पातळीवर काही पडद्याआडून हालचाली झाल्या तरच भाजप नमते घेईल व पटेल यांच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा होऊ शकेल. पण मुख्यमंत्र्यांना ते मान्य होणे कठीण आहे. एकूणच ही निवडणूक चुरशीची होत आहे.
मुख्यमंत्र्यांचा उमेदवार
नागपूर महापालिकेतील नगरसेवक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत ‘विश्वासू’ परिणय फुके यांना भंडारा-गोंदियामध्ये आयात करण्यात आले आहे. मुंबई आणि नागपूरमध्ये बडय़ा वर्तुळात ऊठबस असणाऱ्या फुके यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधान परिषदेत संख्याबळ वाढविण्याकरिता मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच तडजोडीचे राजकारण केले जाणार नाही, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते. फुके यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीचा फायदा झाला, असाही एक अर्थ काढला जातो.