बुलढाणा: बुलढाणा मतदारसंघावरून काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे जाहीर केले. दरम्यान, दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा काँग्रेसला सोडण्याची मागणी चुकीची नाही. मात्र त्यासाठी राजीनाम्याची धमकी देऊन पक्षावर दवाबतंत्राचा वापर करणे चुकीचे असल्याची भूमिका मांडली.
शनिवारी संध्याकाळी प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड समर्थकांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तुळशीराम नाईक ,दीपक रिंढे, ऍड गणेशसिंह राजपूत, राम डहाके, एकनाथ चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. बुलढाणा काँग्रेसला सुटण्याची मागणी करणे गैर नाही. पण त्यासाठी सामूहिक राजीनामे देण्याची भाषा करीत पक्षावर दवाब आणणे व त्यांची कार्यपद्धती चुकीची आहे. महाविकास आघाडीसाठी जिल्ह्यात चांगले वातावरण असून असा प्रकार म्हणजे काँग्रेसची प्रतिमा मालिन करणे होय. तसेच एकसंघ आघाडी मध्ये विष कालविणे असून जनतेमध्ये यातून चुकीचा संदेश गेल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जागा वाटप, उमेदवार निवड ही वरिष्ठ पातळीवर होते. हुकूमशाही पद्धतीच्या केंद्र सरकारमुळे देश, लोकशाही, संविधान, धोक्यात आले आहे. त्याविरोधात राहुल गांधी, इंडिया आघाडी लढा देत असतानाच दवाबतंत्राचा वापर करून आघाडीतील वातावरण खराब करणे चुकीचे आहे. याचा लाभ विरोधकांना होऊ शकतो,अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी शैलेश खेडेकर, गौतम मोरे, संतोष पाटील,रियाज शेख , वृषभ साळवे,अमन चव्हाण, उमेश चव्हाण उपस्थित होते.
हेही वाचा…बुलढाणा: चौघा सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजि
शुक्रवारी रंगले होते राजीनामा नाट्य
यापूर्वी शुक्रवारी ( दि२२) काँग्रेसच्या बुलढाणा, मोताळा तालुक्यातील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ समर्थक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांची भेट घेतली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणीसाठी आपण पदाचे राजीनामे दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही स्थितीत बुलढाणा काँग्रेसला सोडावा अशी मागणी करून अन्य पक्षाच्या निष्क्रिय उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी तंबीच त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष बोन्द्रे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा करून त्यांच्या भावना कळविल्या.