नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न केल्याबद्दल महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सचिव अभिषेक धवड यांच्यासह ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर नागपूर (ग्रामीण) युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे आणि गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांना निलंबित करण्यात आले आहे.
पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारात सहभागी न होणे, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभाग न घेणे आणि तसेच बेजबाबदारपणे वागणे यासाठी निलंबन करण्यात आले आहे. तर पक्षाच्या ठरवून दिलेल्या कार्यक्रमात सहभागी न होणे आणि समाधानकारक काम न करणे आदी कारणांसाठी शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवड, माजी नगरसेविका व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नेहा निकोसे, कीर्ती आकरे, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, सचिव आकाश हेटे, आकाश घाटोळे यांच्यासह ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस अखिल भारतीय युवक काँग्रेसने बजावली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…अबुझमाड जंगलात चकमक, १० नक्षलवादी ठार, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आहेत. हे सर्व पदाधिकारी विदर्भातील आहेत. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील सर्व दहा जागांवर मतदान झाले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवानी वडेट्टीवार स्वत: इच्छुक होत्या. पण, तेथे प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार नाराज होत्या. त्यांनी पक्षाचे काम केले नसल्याची तक्रार आहे.
तर तनवीन विद्रोही, अभिषेक धवड, आकाश हेटे आणि नेहा निकोस यांनी नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा प्रचार कार्यात सहभाग घेतला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांना युवक काँग्रेसमधून पदमुक्त केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.