राजेश्वर ठाकरे
नागपूर : काँग्रेसने पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून नागपुरात आज जाहीर सभा आयोजित केली असून या सभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या सभेनंतर १४ जानेवारीपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई ‘न्याय यात्रे’ला प्रारंभ होत आहे.
काँग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीत इंडिया आघाडीत महत्त्वाच्या भूमिकेत राहील, असा दावा करीत या पक्षाकडून भाजपच्या मातृसंस्थेचे मुख्यालय असलेल्या शहरातून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा सभेसाठी येत आहेत. याशिवाय विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे (सेल) प्रमुख येथे येणार आहेत. येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या द्वेषपूर्ण विचारांच्या विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कंपनीची १६ लाखांनी फसवणूक; विमान प्रवास, निवासाचे बनावट बिले सादर
सभेबाबत प्रदेशाध्यक्ष पटोले काय म्हणाले?
ही सभा देशातील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. जेव्हा-जेव्हा देश संकटात आला, तेव्हा काँग्रेसने पुढाकार घेतला आणि देशात मोठे परिवर्तन घडवून आणले. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात जाहीर सभा घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की, विदर्भातील सर्व जागा काँग्रेसला मिळाल्या. नागपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि देशात मोठे परिवर्तन घडेल. या सभेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी १४ जानेवारी २०२४ पासून मणिपूर ते मंबई न्याय यात्रा काढणार आहेत, अशी माहितीही पटोले यांनी दिली.