भाजपच्या स्थानिक नेत्याचा विरोध असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दर्शन कॉलनीच्या मैदानावर वज्रमुठ सभेसाठी सुरू करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.नागपुरातील वज्रमुठ सभेची जबाबदारी असलेले माजी मंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नेत्यांनी मैदानावर पाहणी केली.
आमच्या सभेला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे सांगितले जात असले, तरी आम्हाला कुठेही विरोध दिसत नाही. काही अटी शर्तींसह आम्हाला नागपूर सुधार प्रन्यासने मैदानावर राजकीय सभेची परवानगी दिली आहे.. आम्ही त्या अटी शर्तींचे पालन करू. आम्ही व्यासपीठ उभारण्यासाठी सुद्धा मैदानावर खड्डे खोदत नाही. मैदानावरील क्रीडा सोयी खराब होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असे महाविकास आघाडीचे नेते सुनील केदार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर: ‘पैसे पाठव, नाहीतर बहिणीचे अपहरण करू…’
कोणतीही राजकीय सभा जमिनीवरच होऊ शकते .हवेत होऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय सभा घ्यायची असल्यास कुठले तरी मैदान घ्यावेच लागेल, अशा शब्दात महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी भाजपला चोख उत्तर दिले.