अमरावती : शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याविषयी जाब विचारण्यासाठी मंगळवारी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात आला नाही, तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली.
शहरातील बहुतांश भागात अनयिमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल सुरू आहेत रात्री ११, १२ वाजता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जीवन प्राधिकरण कार्यालयात विचारणा केल्यावर प्रत्येक वेळी वेग-वेगळी कारणे देण्यात येतात. शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा यावर कुठलाही तोडगा काढण्यात येत नाही. मे मध्ये तर पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल होणार आहेत. २०-२५ वर्षांअगोदर जी परिस्थिती पिण्याच्या पाण्याची होती, ती आज आधुनिक काळात बहुतांश भागात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. निगरगट्ट सरकार सुद्धा झोपी गेले आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शहराला जेवढ्या पाणीपुरवठ्याची गरज आहे तेवढे पाणी जीवन प्राधिकरणाला आणणे शक्य होत नाही. मोठ्या जलवाहिन्या कमकुवत झाल्या आहेत. या जलवाहिन्या फुटणे, गळती होणे हे प्रश्न निर्माण होत आहे, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. नवीन जलवाहिन्यांचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली, तेव्हा ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्कऑर्डर दिल्यानंतर सुद्धा कंत्राटदार काम करीत नाही, असे उत्तर देण्यात आले.
अशा कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. वीज पुरवठा वारंवार खंडित होत राहतो त्यामुळे पाणीपुरवठा योग्य रित्या करणे शक्य होत नाही, असेही सांगण्यात आले. यावर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने संताप व्यक्त केला. जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये सदर सर्व मुद्दे का पुढे करण्यात येत नाही? अशीही विचारणा करण्यात आली. शासन व प्रशासन यांचे आपसात कुठलेही नियोजन नसल्यामुळे जनतेला अत्यंत त्रास सहन करावा लागत असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.