उपराजधानीत उद्या आंदोलन
सणासुदीच्या काळात डाळींच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने सामान्य जनतेचे बजेट बिघडले असून अनेकांच्या जेवणाच्या ताटातून वरण गायब झाले आहे. भाजप सरकारने दिवाळी सणाच्या तोंडावर लादलेल्या डाळ दरवाढी विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी आणि मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. नागपुरात हे आंदोलन २७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना डाळ दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काही जिल्ह्य़ात उद्या, सोमवारी तर काही ठिकाणी मंगळवारी हे आंदोलन होणार आहेत.
केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असताना २०१४ च्या तुलनेत सध्याच्या केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. तांदूळ, गहू, मिरची, गोडे तेल, साखर, रवा, मैदा, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, सुके खोबरे, नारळ, गुळ, कांदे, बटाटे, सर्व भाज्या यांच्या भावात दुप्पट व तिपटीने वाढ केली आहे. सर्वसामान्य जनतेवर महागाई लादणाऱ्या सरकारच्या निषेधार्ध व गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात डाळ उपलब्ध व्हावी यासाठी काँग्रेसतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना यावेळी निवेदन देण्यात येणार आहे.
काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली असून तशा सूचना सर्व जिल्हाध्यक्षांकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘अच्छे दिनचे आश्वासन निघाले नकली, महाग झाली शेव, लाडू आणि चकली’, ‘स्वस्त करा, स्वस्त करा डाळींचे दर स्वस्त करा’, ‘सर्वसामान्यांची दिवाळी सोपी करा, रेशन दुकानात स्वस्त डाळ विक्री करा’ ‘ दिवाळं नको, दिवाळी हवी, डाळ आम्हाला स्वस्त हवी’, ‘अबकी बार, साठेबाजांचे सरकार’ आदींच्या घोषणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा