लोकसत्ता टीम
नागपूर : सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसने केली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी “ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जातनिहाय जनगणेची मागणी करत आहेत” असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपची मनुवादी वृत्ती दर्शवली आहे, असा आरोप करीत शहर काँग्रेसने गुरुवारी व्हॅरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.
शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथाबुक्क्यांना तुडवून रोष व्यक्त केला. तसेच काही कार्यकार्त्यांनी शहरबस अडवली आणि त्याबसमोर उभे राहून केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार ॲड. अभिजीत वंजारी, तानाजी वनवे, नॅश अली, प्रज्ञा बडवाईक, प्रा. दिनेश बानाबाकोडे, गिरीश पांडव, मनोज सांगोळे, संदीप सहारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आणखी वाचा-दूषित पाणी पुरवठा ग्रामस्थांच्या जीवाववर! गोंदियाच्या नवेगावबांधमध्ये ६० गावकऱ्यांना अतिसाराची लागण
दरम्यान काँग्रेसने भाजप, पंतप्रधान मोदी आणि अनुराग ठाकरे यांचा निषेध आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी आपल्या पक्षाच्या मनुवादी वृत्तीचे प्रदर्शन करून भारतातील ८० टक्क्यांहून अधिक बहुजन समाजाचा अवमान केला आहे. लोकसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेत्याची जात विचारणारे लोक त्याच विचारसरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता. याच लोकांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज, महान समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, प्रबोधनकार ठाकरे, या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले. आज २१ व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती कायम असल्याचे भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवून दिले आहे.
आणखी वाचा-हृदय, यकृत प्रत्यारोपण नि:शुल्क; नागपूरच्या सुपरस्पेशालिटीत गरीब, मध्यमवर्गीयांना मिळणार लाभ
चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुवादाचे प्रदर्शन करणा-या अनुराग ठाकूर याच्या समर्थनार्थ ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुवादाचे समर्थन केले आहे. पंतप्रधानाचे हे कृत्य अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षा अधिक गंभीर आहे. संविधानाची शपथ घेऊन देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेला व्यक्ती मनुवादाचे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन कसे काय करू शकतो? देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करतो हे या देशाचे दुर्दैव आहे. संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथ घेणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.