विधानसभेवरील मोर्चासाठी काँग्रेसची तयारी
दिवाळीच्या माहोल सुरू असताना मोर्चाच्या तयारीची सूचना स्थानिक काँग्रेस नेत्यापर्यंत धडली असून विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या शहरातील नेत्यांना प्रत्येक पाच हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी करवून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पाठोपाठ बिहार निवडणुकीत अनपेक्षित यश आल्याने काँग्रेसमध्ये उत्साह असून ऐन दिवाळीत अशाप्रकारच्या सूचना प्राप्त झाल्याने नाराजी व्यक्त न करता  हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या तयारीला नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
महागाई, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतमालास भाव या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढणार आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्याने हताश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे मोठे आव्हान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर होते. परंतु सत्ता जाऊन वर्ष होत नाही तोच प्रथम गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत आणि त्यानंतर नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे पुनरागमन झाले. फारसे काही न करता अशाप्रकारे ग्रामीण भागातील जनता काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याने काँग्रेस नेत्यांना हुरूप आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे बचावात्मक भूमिका घेणारे नेते आणि कार्यकर्ते निराशेच्या सावटातून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने राज्यातील विशेषत विदर्भातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्यावर्षी देखील काँग्रेसने विधानसभेवर मोर्चा काढला होता. परंतु नेते पराभवाच्या धक्क्य़ातून सावरले नसल्याने मोर्चात उत्साह नव्हता आणि राष्ट्रीय पक्षाला शोभेल अशी मोर्चातील लोकांची संख्या नव्हती. शिवाय नवीन सरकारला काम करण्याची संधी न देताच हल्लाबोल करण्याचे विदर्भातील जनतेला पटले नव्हते. यावेळी मात्र काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि बिहार निवडणुकीत विजय झाला. तसेच नवीन सरकारच्या कारभाराला वर्ष झाले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महापालिका आणि बिहार निवडणुकीतील पराभवामुळे भाजपचे मनोबल खचले आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने युती सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे (पश्चिम नागपूर), नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील (दक्षिण-पश्चिम), माजी मंत्री अनीस अहमद (मध्य नागपूर), माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), माजी मंत्री सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर) आणि अ‍ॅड. अभिजित वंजारी (पूर्व नागपूर) यांना प्रत्येकी पाच हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी करून घ्यायचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा