नागपूर : वेगवेगळया कारणांवरून विदर्भात विविध ठिकाणी हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात काही ठिकाणी दगडफेक झाल्याने अनेक जण जखमी झाले. संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा उपयोग करावा लागला.

पहिल्या घटनेत अकोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला गालबोट लागले. वाशीम बायपास परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला. त्या वादातून दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरखेड या संवेदनशील गावात दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली, परस्परांवर दगडफेक करण्यात आली.

दोन्ही गटांतील मिळून ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. झेंडा लावण्यावरून हा वाद झाला. तिसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर त्याच प्रभागातील आरोपीने अत्याचार केला. यामुळे संतप्त नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घालत दगडफेक सुरू केली.

कॅफेमालकाची हत्या

नागपुरातील अंबाझरीत कॅफेमालकावर दुचाकीने आलेल्या चौघांनी सहा गोळ्या झाडल्या. यामधील चार गोळ्या शरीरात घुसल्याने कॅफेमालकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अविनाश राजू भुसारी (२८, जयताळा रोड, प्रगतीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.

राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचे सांगत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात उद्या, बुधवारी नागपूरमध्ये सद्भावना शांती मार्च आयोजित करण्यात आला आहे.