दारुण पराभवानंतर विजनवासात गेलेल्या नागपुरातील काँग्रेस नेत्यांना आता महात्मा गांधी आठवू लागले आहेत. सध्याचे वातावरण असहिष्णू आहे, असा आरोप करत शहरातील वयोवृद्ध गांधीवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून दर आठवडय़ाला एकेका चौकात धरणे देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत ही काँग्रेसची मंडळी चेहरा तसेच दंडावर काळ्या फिती लावून बसताना दिसू लागली आहेत. या सर्वाना अचानक गांधी आठवण्याचे कारण अगदी स्पष्ट व सर्वाना समजणारे आहे. येत्या वर्षभरात नागपूर महापालिकेची निवडणूक आहे. यात सहभागी व्हायचे असेल तर सर्वात आधी गांधी अथवा गांधीवाद्यांना जवळ करण्याशिवाय तरणोपाय नाही, याची कल्पना या नेत्यांना आहे. तसेही काँग्रेस पक्ष अडचणीत असला की, पक्षनेत्यांना गांधीच आठवतात. गांधींवरचे स्वामित्व फक्त आमचे, इतर कुणाचे नाही, याच थाटात ही नेतेमंडळी वावरत असतात. केवळ नागपूरच नाही, तर सर्वदूर कमीअधिक फरकाने हेच चित्र दिसते. केवळ महात्म्याचे नाव घेतले म्हणजे या शहरातील निवडणूक जिंकता येईल का?, या प्रश्नाचे उत्तरही या नेत्यांना ठावूक आहे. तरीही सक्रियतेसाठीचे पहिले नमन गांधींचे नाव घेऊन, अशीच या नेत्यांची आजवरची धारणा राहिली आहे.
एखादा समज जेव्हा सवयीत बदलतो तेव्हा वेगळा विचार सुचत नाही. मग प्रत्येक कृतीत साचलेपण येत जाते. नेमके तेच या नेत्यांच्या बाबतीत झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेच नेते काँग्रेसची सूत्रे सांभाळत आहेत. या नेत्यांच्या वयाची इतर पक्षातील मंडळी कधीचीच निवृत्त झाली. त्यांची जागा नव्या दमाच्या नेत्यांनी घेतली. या नव्या नेत्यांवर लोकप्रेमाची मोहोर सुद्धा उमटली, पण हे नेते मात्र अजूनही राजकारणातील सक्रियता कमी करायला तयार नाहीत. लोकांनी नाकारले तरी चालेल, पण नेतेपदाची झूल काढणार नाही, असाच यांचा आजवरचा पवित्रा राहिलेला आहे. सामान्य मतदार एक दिवस जरूर सत्तापक्षाला कंटाळेल व आपल्या बाजूने वळेल, असा दुर्दम्य आशावाद हे नेते बाळगून आहेत. हाच आशावाद यांच्या सक्रियतेला शक्ती प्रदान करत असतो. गेल्या दहा वर्षांपासून नागपूर पालिकेत भाजप सत्तेत आहे. भाजपची सत्ता येथील सामान्य जनतेला सुखावणारी, दिलासा देणारी आहे, असे समजण्याचे काही कारण नाही. साध्या मूलभूत प्रश्नांवर लोकांना अजूनही झगडावे लागतेच. मात्र, याचा फायदा घेण्याची कुवत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये कधीच दिसली नाही. काँग्रेसच्या वर्तुळात नव्या दमाचे तरुण आहेत, पण त्यांचे पाय खेचण्याचा उद्योग सतत सुरू असतोच. केवळ आपले आंधळे समर्थक, आपली मुले व नातेवाईक हेच राजकारणात समोर कसे येतील, त्यांनाच उमेदवारी कशी मिळेल, याच विचारात या पक्षाचे पराभूत नेते कायम गढलेले असतात. परिणामी, लायक व योग्य व्यक्तींनी संधी मिळत नाही व त्याची परिणती पराभवात होते. हाच धडा या पक्षाचे नेते प्रत्येक निवडणुकीतून घेत आले आहेत. प्रत्येक पराभव हा काहीतरी नवे शिकवणारा असतो, असे म्हणतात. नेमके हेच या नेत्यांच्या बाबतीत घडत नाही.
पराभवानंतर आत्मचिंतन, परीक्षण करता येते. ते हे नेते करत असतील का, असा प्रश्न अनेकांना पडतो. या नेत्यांना मात्र पडत नाही. खरे तर पराभव, त्यातून शिकणे, सावरणे यावर महात्मा गांधींनी अनेकदा विचार व्यक्त केले आहेत. आता गांधींचे नाव घेणारे हे नेते या विचाराला जवळपासही फिरकू देत नाहीत. गांधींचे नाव हवे, त्यांचे विचार नको, असा हा सरळसरळ मामला आहे. प्रत्येक माणूस वयोपरत्वे निवृत्तीचा विचार करू लागतो. अनेकदा शरीर थकते व थांबण्याची सूचना मन देत असते. हा निवृत्तीचा विचार या नेत्यांच्या स्वप्नातही येत नाही. निवृत्त झालो तर आपल्या वारसांचे, समर्थकांचे काय?, हा प्रश्न या नेत्यांना हैराण करत असावा. त्यामुळे पक्ष हरला तरी चालेल, पण निवडणुकीवर नियंत्रण आम्हीच ठेवणार, असा हेका ही नेतेमंडळी कायम धरून असतात. प्रत्येक नेतृत्वाचा एक कालखंड असतो. तो सरला की, लोक नव्या चेहऱ्याचा शोध घेऊ लागतात. केवळ राजकारणातच नाही तर इतरही क्षेत्रात हे घडत असते. आपला कालखंड संपला, ही कल्पनाच या नेत्यांना सहन होत नाही. आता आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत, असा आव हे नेते जाहीरपणे आणत असतात. प्रत्यक्षात निवडणूक आली की, प्रत्येक टप्प्यावर हस्तक्षेप करत पुन्हा नेतेपदाचीच भूमिका पार पाडत असतात, हा अनुभव अनेकांना आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या राजकारणावर पकड ठेवून असणारे महात्मा गांधी चतुर होते. त्यांच्या या चातुर्यात पक्ष व त्याचे हित सर्वोच्च होते. त्यात डावपेचाला थारा नव्हता. आता गांधींचे नाव घेणारे हे नेते कुरघोडीच्या राजकारणाला क्षम्य मानतात. आता ‘आपला’ माणूस महत्त्वाचा, याला प्राधान्य दिले जाते. पक्षाचा उमेदवार आपला नाही, मग पाडा त्याला, अशी भूमिका सर्रास घेतली जाते. गंमत म्हणजे, एकीकडे गांधींचे नाव घ्यायचे व दुसरीकडे पाडापाडीचे राजकारण करायचे, हा विरोधाभास हे नेते सहज पचवून जातात. कुणीही त्यांना त्याबद्दल जाब विचारत नाही. पक्षातील वरपासूनचे नेते एकमेकांना सांभाळून घेत असतात. खरे तर, या सगळ्या खेळात पदोपदी असहिष्णुता दडलेली आहे. तरीही घरातील या असहिष्णुतेकडे डोळेझाक करीत हे नेते विरोधकांच्या असहिष्णुतेवर तावातावाने बोलत गांधीवाद्यांच्या उपोषणात सहभागी होत राहतात. आहे ना गंमत!
– देवेंद्र गावंडे – devendra.gawande@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा