नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असा टोला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला. ते नागपूर येथे बोलत होते.
काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रियेनुसारच निर्णय घेतले जातात. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरू झाली. या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते तर पुढचा प्रसंग टळला असता, या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थ नसतो. पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले , असे म्हणणेही योग्य नाही.
हेही वाचा – नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकरासह आईवर गुन्हा दाखल
काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यावेत हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. निर्णय चुकीचा ठरला असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरून नाही, असेही लोंढे म्हणाले.