नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी एका विशिष्ट समाजाला दोष देणारे वक्तव्य करतात. भाजपचे नेते, सरकारमधील मंत्री कायदा-सुवस्था बिघडवून शकतील, असे वक्तव्य करतात. त्यांनी जणून चिथावणीचा कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे माणिकराव ठाकरे यांनी केला.
राज्य सरकारची प्रमुख जबाबदारी कायदा आणि सुवस्था राखण्याची आहे. सर्व जाती, धर्माच्या लोकांना सुरक्षित ठेवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री दंगल घडवण्याचे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचे म्हणतात. हे जर षडयंत्र असेल तर त्यांचे पोलीस खाते काय करत होते. हे सरकार राज्य कारभार चालवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त करावी, असेही ठाककरे म्हणाले.
नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाच दिवसानंतर दंगलग्रस्त भागाची पाहणीसाठी एक समिती स्थापन केली आहे.
काँग्रेसची ही समिती आज नागपुरात आली. दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची त्यांना पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे समितीने त्या भागातील हिंदू आणि मुस्लीम बांधवांना बोलावून रविभवनमध्ये चर्चा केली.
समितीमध्ये माणिकराव ठाकरे, आमदार आमदार साजिद पठाण, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेसचेचे सचिव प्रफुल्ल गुडधे हे समन्वय आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात संचारबंदी केली आहे.
महाल, इतवारी, गांधीबाग, लकडगंज, कोतवाली या परिसरातील बाजारपेठा कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवानाना तैनात केले आहे. शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील या काही निवडक लोकवस्त्या वगळता नागपूर शहरात इतरत्र सामान्य जीवन आहे.