नागपूर : सचिन वाझे, रवींद्रनाथ पाटील यांसारख्या आरोपी, गुन्हेगारांना पुढे करून, त्यांना ब्लॅकमेल करून कट कारस्थाने रचून भाजप आपली पापेही झाकू शकणार नाही आणि पराभवही टाळू शकणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राज्यभरात विविध भागामध्ये भाजपच्या नेत्यांकडून भ्रष्टाचारात कमावलेले पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. विनोद तावडे यांना आज पैसे वाटताना लोकांनी रंगेहाथ पकडले, काल नाशिक येथे सत्ताधारी पक्षाची मोठी रक्कम सापडली, वर्धा येथे भाजपची दारु पकडली आहे या सर्व गोष्टींवरून लक्ष वळविण्यासाठी रवीद्रनाथ पाटील नावाच्या एका भामट्याला आयपीएस अधिकारी असल्याचे दाखवून मतदानाच्या अगोदरच्या दिवशी रात्री उशीरा भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.
हेही वाचा : चंद्रपूर : पैसे वाटप करणाऱ्यांना ग्रामस्थांनी पकडले, निवडणूक पथकाच्या…
भाजपाने ज्या व्यक्तीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून पुढे केले तो रवींद्रनाथ पाटील आयपीएस ॲाफिसर कधीही नव्हता ट्रेनिंग पूर्ण केले नाही त्यामुळे त्याला हाकलून दिले होते. बिटकॅाईनच्या घोटाळ्यात हा व्यक्ती जेलमध्ये होता पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांसह या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहे याची आमच्याकडे माहिती आहे. भाजपने दाखवलेल्या क्लीपमधील आवाज नाना पटोलेंचा नाहीच. हे लहान मूल ही सांगू शकेल. भाजपच्या या बनावटगिरीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असे अतुल लोंढे यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.