नागपूर: काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी शनिवारी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्ही अदाणी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. सरकारने या समितीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. लोकसभेत भाजपचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच जेपीसीमध्ये सुद्धा अर्ध्याहून अधिक खासदार त्यांचेच असणार आहेत. परंतु पंतप्रधान मोदी आपल्या पक्षाच्या खासदारांना घाबरताना दिसतात. त्याचे कारण भाजप खासदारांमध्ये मोदींबाबत रोष आहे.
हेही वाचा >>> नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी ओवैसींचा मोदींना पाठिंबा, पण घातली ‘ही’ एकच अट….!
हे सगळे खासदार आपल्याला घरी बसवतील, असे मोदींना वाटत असावे. याही पुढे जाऊन मोदी नेमके कोणाला घाबरतात हे मी सांगणार होतो. पण, जाऊ द्या त्यांचा आज वाढदिवस आहे. गौरव वल्लभ म्हणाले, अदाणी समूहाच्या व्यवहाराबाबत अमेरिकेतील हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अहवाल आल्यापासून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी करीत आहेत. परंतु केंद्र सरकार ते मान्य करीत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अदाणी यांची मैत्री असल्याचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालायने या प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीला प्रथमदर्शनी अदाणी समूहाच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. यावर विचारलेल्या प्रश्नावरून गौरव वल्लभ म्हणाले, प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणे अयोग्य आहे. लोकशाहीमध्ये संसद सर्वोच्च आहे.