अमरावती: अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्‍या विजयात अमरावती मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला असून अमरावतीतून त्‍यांना तब्‍बल ४१ हजार ६४८ इतके भरघोस मताधिक्‍य मिळाले आहे. त्‍यांचे गृहक्षेत्र दर्यापूर, तिवसा आणि अचलपूरमधूनही त्‍यांना साथ मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्‍या पराभूत उमेदवार नवनीत राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून तब्‍बल २६ हजार ७६३ आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ५९५ इतके मताधिक्‍य मिळाले आहे. बडनेराचे प्रतिनिधित्‍व नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे करतात. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्‍या मेळघाट मतदार संघातून नवनीत राणा यांनी घेतलेली आघाडी ही लक्षवेधी ठरली आहे. या दोनच मतदारसंघांतून नवनीत राणा यांना मताधिक्‍य मिळू शकले, इतर चारही मतदारसंघांमध्‍ये त्‍या पिछाडीवर राहिल्‍या.

हेही वाचा >>>यवतमाळ-वाशीमचा गड ठाकरे गटाने राखला; संजय देशमुख ९४ हजार ४७३ मतांनी विजयी

वानखडे यांना अमरावतीतून ४१ हजार ६४८, तिवसामधून १० हजार ५७६, दर्यापूरमधून ८ हजार ६७१ तर अचलपूरमधून ६ हजार ७९३ इ‍तके मताधिक्‍य मिळाले. अमरावती, दर्यापूर आणि तिवसा या तीन मतदारसंघांवरील कॉंग्रेसचे वर्चस्‍व या निवडणुकीच्‍या निमित्‍ताने अधोरेखित केले आहे.

तिवसाच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्‍या प्रचाराची मुख्‍य धुरा सांभाळली होती. त्‍यांच्‍या मतदारसंघातून वानखडे यांना मताधिक्‍य अपेक्षित होते, ते त्‍यांना मिळाले. पण स्‍वत:च्‍या दर्यापूर मतदारसंघात बळवंत वानखडे हे फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही. त्‍यांच्‍या गृहक्षेत्रातून मिळालेली मतांची आघाडी ही ८ हजार ६७१ इतकी आहे. महायुतीत असूनही भाजपच्‍या उमेदवाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्‍चू कडू यांच्‍या अचलपूर मतदारसंघातून बळवंत वानखडे यांना ६ हजार ७९३ इतके मताधिक्‍य मिळाले आहे. दुसरीकडे, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना सर्वाधिक २७ हजार ३५७ मते अचलपूरमधून प्राप्‍त झाले असले, तरी ते या ठिकाणी देखील तृतीय क्रमांकावर राहिले.

हेही वाचा >>>wardha Lok Sabha Election Result 2024 वर्धा : रामदास तडस यांना ‘हॅटट्रिक’ची हुलकावणी

वानखडे यांना अमरावती मतदारसंघाने निर्णायक आघाडी मिळवून दिली. अमरावतीतून वानखडे यांना १ लाख १४ हजार ७०२ मते मिळाली, तर नवनीत राणा यांच्‍या पदरात ७३ हजार ५४ मतांचे दान पडले. अमरावतीतून नवनीत राणा यांना आघाडीची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. अमरावतीकर मतदारांनी बळवंत वानखडे यांना पसंती दिली. नवनीत राणा यांना मेळघाटमधून १ लाख १ हजार १५४ तर बडनेरामधून १ लाख १२४ मते प्राप्‍त झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress stalwart balwant wankhade won from amravati lok sabha constituency mma 73 amy
Show comments