लोकसत्ता टीम
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याचे धाडस करतो. हे फडणवीसांना अमान्य असेल तर त्या बेदरकार मंत्र्याचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेश मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केली.
भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवावे, असे लोंढे म्हणाले.
काय म्हणाले कोकाटे?
हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे. या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल.
सद्यस्थितीत पीक विम्याचे ४ लाख अर्ज नामंजूर करण्यात आलेत. सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही. अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकांमुळे असे घडले असावे असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. पण यात सुधारणा करण्याची गरज आहे.
कृषी विभागात सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामु्ळे आकृतीबंध तयार करून भरती करण्याचा विचार करत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांना एका विशेष सिरीजचे क्रमांक देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी कृषी मंत्र्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत एक कायमस्वरुपी नंबर असेल, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.