अकोला : शहरातील जातीय तणावाच्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हिंदू, मुस्लीम वाद करू नये, माणुसकी जोपासावी, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे. अकोल्यातील जुने शहर येथील हरिहरपेठ भागात किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून दोन वेगवेगळ्या समाजातील मोठे समुदाय आमने-सामने आले. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करण्यात आली. यात काही जण जखमी झाले. त्यानंतर संतप्त जमावाने एका ऑटो रिक्षा व दोन दुचाकीला आग लावली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहेत. अकोल्यातील जातीय वादावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
नाना पटोले म्हणाले, ‘अकोला येथे झालेली दंगल खऱ्या अर्थाने माणुसकीला शोभा न देणारी घटना आहे. राजकीय उद्देश व फायद्यासाठी काही लोक मुद्द्याहून या प्रकारच्या घटना करतात. भाजप निवडणुकीच्या काळामध्ये या प्रकारच्या घटना सातत्याने करतात. आत्ताच नव्हे तर अनेक वर्षांपासून हे आपण पाहत आलो आहोत. मतांच्या राजकारणासाठी हिंदू, मुस्लीम असे करू नका. माणुसकी जोपासावा. पुढच्या काळामध्ये अकोल्यामध्ये या पद्धतीच्या घटना होऊ देऊ नका. ऐक्याचे वातावरण राहिले पाहिजे.’ केंद्र व राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. गृहमंत्र्यांची जबाबदारी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्या काळामध्ये या प्रकारे हिंदू, मुस्लीम वाद व दंगली होऊन सर्वसामान्यांचे त्यात नुकसान होत असेल, तर त्याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, असे देखील नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >>>“राजकुमार पटेलांना बच्चू कडूंनीच शिवसेनेत पाठवले,” रवी राणांचा गौप्यस्फोट
या प्रकारच्या राजकीय दंगलीमध्ये सर्वसामान्यांनी सहभागी होऊ नये. काळजी घ्यावी. अकोला शहरामध्ये हिंदू, मुस्लीम असे ऐक्याचे वातावरण रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुलगा व भाऊ म्हणून सदैव अकोलेकरांच्या सुख व दु:खात सहभागी राहील. या प्रकारच्या घटना करणारा जो कोणी असो जवळचा किंवा दूरचा त्याला माफी दिली जाणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.