गोंदिया : लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यामुळेच महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण,’ योजना सुरू केली. आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात ज्या पाच ‘गॅरंटी’ दिल्या होत्या, त्यात या योजनेचा समावेश होता. आमचीच नक्कल हे महायुती सरकार करायला निघाले आहे, पण नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल या महायुतीच्या सरकारमध्ये नाहीच, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारला लगावला.
काँग्रेसचे दोन नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेवराव किरसान यांच्या जाहीर सत्कार व काँग्रेस कार्यकर्ता आणि पक्षप्रवेश मेळावानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे रविवारी आयोजित कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण,’ योजना लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतलेला आहे. महागाईत भरमसाठ वाढ करून या सरकारने राज्यातील भगिनींना आधीच पिळले आहे. त्यांच्या मुलाबाळांना, कुटुंबीयांना उपाशी ठेवले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भगिनींची मते घेण्याकरिता त्यांच्याद्वारे चालविलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरेल. जनतेला या सत्तापीपासू लोकांचा खरा चेहरा कळून चुकला आहे.
हेही वाचा…“रन अँड हिट प्रकरणात कोणालाही पाठीशी घेतली जाणार नाही…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हे सरकार सर्वसामान्यांचे कधीच भले करू शकत नाही. याची प्रचिती जनतेने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यांना महाराष्ट्रात दाखविलेली आहे. हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अशी प्रलोभने देणारी वृत्ती आणि त्यांची मानसिकता मतदारांना कळून चुकली आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारराजा यांना चांगले उत्तर देईलच. याच भीतीतून त्यांनी मतदारांना चुचकारण्यासाठी लाडकी बहीण योजना हा एक प्रयत्न केला आहे. आधी महिलांना लुटले, मागील १० वर्षे याची यांना काळजी नाही, पण आता यांना लाडकी बहीण या मताच्या रूपाने दिसू लागली आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने असे निर्णय माझ्यामते योग्य नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार राज्यात येणार आहे, असेही याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.