लोकसत्ता टीम
नागपूर : ‘मन की बात’ करणारे सरकार असल्याने जनतेच्या श्रद्धा, जनभावनेला कुठलीची किंमत नाही. दीक्षाभूमीवर परवा जी घटना घडली हा त्याचाच परिपाक आहे, भाजपची कार्यपद्धती ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’ हीच आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते आज नागपूर निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
ते म्हणाले, शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक उदाहरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादीच घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत. वायकर प्रकरणावर फारसे बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चिट देऊन फाईल बंद केली. यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे नाना पटोले म्हणाले.
आणखी वाचा-१४० एकर जमिनीवर आमदार समीर कुणावार यांचा डोळा, तर कुणावार म्हणतात…
पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलीसच सुरक्षित नाहीत ही परिस्थीती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्यानावाखाली आरोपींना पंचतारांकित सुविधा दिली जाते. नागपूरमध्येही मद्यधुंद महिला कारचालकाने दोन तरुणांना कारखाली चिरडले. ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे आरोपींना जामीन मिळाला. धनाढय घरातील आरोपींना कसलीच भीती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिंमत होते, असे पटोले म्हणाले.
आणखी वाचा- वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी वारीनिमित्त धावणार विशेष रेल्वे गाड्या
दीक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. सरकार काही बांधकाम करत असेल आणि आस्था व जनभावनेला धक्का लागत असेल तर विरोध होणारच. जनभावना व आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे, पण सरकार आस्था व जनभावनेला किंमत देत नाही. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे पुतळे या सरकारने हटवून एका कोपऱ्यात बसवले. हे सरकार दीशाभूमीत काही चांगले करेल यावर लोकांचा विश्वासच नाही, म्हणून तो जनक्षोभ दिसून आला, असेही नाना पटोले म्हणाले.