नागपूर : पक्षनेतृत्वावर टीका करीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांना शुक्रवारी निलंबित केले. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत शिस्तपालन समितीचे देशमुख यांच्यावर कारवाई केली. प्रथम भाजपा आणि नंतर काँग्रेसमध्ये स्थिरावू न शकलेला हा युवा नेता आहे तरी कोण आणि त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा? हे जाणून घेण्याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
भाजपा ते काँग्रेस व्हाया विदर्भवादी संघटना असा आशीष देशमुख यांचा आजवरचा राजकीय प्रवास असून, त्यांच्यातील धरसोड वृत्ती त्यांना एका पक्षात स्थिर राहू देत नाही. पक्षातील सर्वोच्च नेत्यांवर टीका करून माध्यामांचे लक्ष वेधून घेणे हा त्यांचा स्थायी भाव. पन्नास वर्षांच्या डॉ. आशीष देशमुख यांची राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसची. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र. जिल्ह्यातील राजकारणात केदार गटाशी न पटल्याने आशीष देशमुख भाजपामध्ये गेले. सावनेर मतदारसंघातून ते केदार यांच्या विरोधात निवडणूक लढले व पराभूत झाले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने सावनेरऐवजी काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत आशीष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करून प्रथम विधानसभेत प्रवेश केला. मात्र काही वर्षांतच त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. थेट फडणवीस सरकारवर टीका केल्याने ते भाजपामध्ये एकाकी पडले. अखेर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यानी काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा – समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला अन काळजाचा ठोका चुकला..
हेही वाचा – विदर्भाला पावसाने झोडपले; वीज पडून दोघांचा मृत्यू, पिकांचे मोठे नुकसान
काँग्रेसमध्ये थेट राहुल यांच्या संपर्कात आशीष होते. काँग्रेसने त्याना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रिंगणात उतरविले होते. मतदारसंघ नवीन असतानाही आशीष यांनी फडणवीस यांना चांगली लढत दिली होती. फडणवीस यांचा ४८ हजार मतांनी विजय झाला होत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले नाही. त्यांनी काँग्रेसमध्येही पक्षनेतृत्वावर टीका करणे सुरूच ठेवले. अ. भा. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आशीष देशमुख यांनी गांधी कुटुंबियांचे उमेदवार खरगे यांच्या ऐवजी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा प्रचार केला. त्यांनी थरूर यांचा नागपूर दौराही घडवून आणला होता. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तत्कालीन मंत्री सुनील केदार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आशीष देशमुख पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा हाती घेतला. २८ सप्टेंबर २०२२ ला त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना नागपूरला निमंत्रित करून विदर्भ राज्याच्या चळवळीला गती देण्याचा निर्धार केला होता. त्यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी विदर्भ आत्मबळ यात्रा काढली होती. अलीकडच्या काळात त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य करणे सुरू केले होते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव असो किंवा संभाजीनगर सभेतील अनुपस्थिती या मुद्यांवरून देशमुख यांनी पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.