नागपूर : राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सदभाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या, बुधवारी नागपूरमध्ये सद्भावना शांती मार्च आयोजित केला आहे. या सद्भावना शांती मार्च मध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच या सदभावना शांती यात्रेत शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस अहमद यांच्या सहभाग राहणार आहे.
सद्भावना शांती मार्च हा सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून सुरु होत असून त्या नंतर नरसिंग टॉकीज, कोतवाली चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क चौक, देवडीया काँग्रेस भवन, भालदारपुरा चौक, गंजीपेठ, गांधी पुतळा आणि रजवाडा पॅलेस येथे समापन होईल.नागपूर हिंसाचारानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे व इतर नेत्यांची एक समिती गठीत करून नागपुरातील घटनास्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक पोलिसांनी काँग्रेसच्या समितीला परवानगी दिली नाही. काँग्रेस समितीने नागपुरमधील विविध संस्था व नागरिक यांच्याशी चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व राज्यपालांची मुंबईत राजभवन येथे भेट घेऊन या घटनेसंदर्भात एक निवेदनही सादर केले आहे. राज्यात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हा सद्भावना शांती मार्च आयोजित केला आहे.
नागपूरच्या महाल, भालदारपुरा, गितांजली चौक आणि हंसापुरी या भागात १७ मार्च २०२५ रोजी हिंसाचार झाला होता. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी गांधी गेट, महाल येथील छपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मुस्लीमांसाठी पवित्र आयत असलेली हिरव्या रंगाची चादरीचा अपमान करून जाळण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास काही मुस्लीम युवक या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आले. यावेळी दगडफेक झाली आणि पुढे हिंसाचार घडला होता.