सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदींसंबंधी केलेल्या वक्तव्याचं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केलं आहे. जुन्या गोष्टी उकरुन काढून, नवे वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे तसंच वातावरण गढूळ करण्यासाठी होत असलेले प्रयत्न टाळण्याचा त्यांचा हेतू असावा. आम्ही मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते आज नागपूर येथील निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
ज्ञानवापी प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”
वडेट्टीवार पुढे म्हणाले की “संघ प्रमुखांनी काल मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथ आणि लोकांना जोडणारी असल्याचं दिसून येतं. परंतु ही भूमिका त्यांनी कायम ठेवली पाहिजे”. “काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभाव अशी राहिली आहे. आम्ही धर्माचे पालन घरात करतो आणि संविधानानुसार राज्य कारभार करतो,” असंही त्यांनी सांगितलं.
मोहन भागवत काय म्हणाले आहेत –
ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे.
“कशाला वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,” अशी विचारणा मोहन भागवत यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केलं.
अयोध्या आंदोलनातील सहभाग हा अपवाद हे आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केलं असल्याचं मोहन भागवतांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, “ऐतिहासिक कारणांमुळे रामजन्मभूमी मोहिमेत सहभागी झालो आणि ते पूर्ण केलं असल्याचं ९ नोव्हेंबरला आम्ही सांगितलं होतं. पण यापुढे आम्हाला कोणत्याही मोहिमेचं नेतृत्व करायचं नाही आहे”.
ज्ञानवापीच्या मशिदीवरील प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “सध्या ज्ञानवापीचा मुद्दा गाजत आहे. आपण इतिहास बदलू शकत नाही. आपण तो इतिहास लिहिलेला नाही, ना सध्याच्या हिंदूंनी, ना मुस्लिमांनी. हे सर्व भुतकाळात झालं आहे”.
यावेळी ते असंही म्हणाले की, “जेव्हा भारतीयांचं मनोधैर्य खच्ची करण्याच्या हेतूने इस्लाम आला तेव्हा हजारो मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली”. तसंच त्यांनी स्पष्ट केलं की, “हीदेखील (नमाज) एक पूजाच आहे. ते आपल्या पूर्वजांचे वंशज आहेत. आपण कोणत्याही पूजेविरोधात नाही”.