नागपूर : जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तसतसे आंदोलनांना अधिक धार येते, पाच वर्ष काहीही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही निवडणुका जवळ आल्या की जाहिरातबाजीवर भर द्यावा लागतो. यातच जर मतदारसंघात व्हीव्हीआयपी असेल तर मग दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप अधिक होतात. नागपुरातील दक्षिण – पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघांत सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात पेटलेले ‘पोस्टर वॉर ‘ चर्चेचा विषय ठरले आहे. रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चरखा संघाच्या माध्यमातून आंदोलन करून महापालिका प्रशासनाच्या भेदभावपूर्ण कारवाईचा निषेध केला.
दक्षिण पश्चिम नागपूर मतदासंघ भाजपचा बालेकिल्ला. पुढच्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असल्याने भाजपाने या मतदारसंघात अनेक ठिकाणी सरकारने केलेल्या विकास कामांचा दावा करणारे फलक लावले. त्याला प्रत्युत्तर म्हणून व ही जनतेची दिशाभूल आहे,असा दावा करिता काँग्रेसने सरकारला प्रश्न विचारणारे फलक लावले. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असे पोस्टर वॉर सुरू झाले. ती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून फलक निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. काँग्रेसच्या फलकासोबत भाजपचेही फलक काढण्यात आले. मात्र त्याचे प्रमाण व्यस्त होते. काँग्रेसचे १० तर भाजपचे २ या प्रमाणात फलक काढण्यात आले,असा आरोप काँग्रेसचा आहे. त्याविरुद्ध रविवारी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध चरख्यावर सूत कातून आंदोलन केले.
हेही वाचा…“महायुतीची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री,” कुणी केला हा दावा?
सत्यशोधक चरखा संघाचे आंदोलन
मागील ८ दिवसांपासून प्रशासनातर्फे अवैध होर्डींग वर कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत आहे. त्या विरोधात रविवार ११ ऑगस्ट ला त्रिमूर्ती नगर चौकात येथे चरखा आंदोलन करण्यात आले. चरख्यावर सुतकताई करून शांतीपूर्वक आंदोलन करण्यात आले,असे काँग्रेस कडून कळवण्यात आले. आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. सत्यशोधक चरखा संघातर्फे मागील काही वर्षापासून महात्मा गांधी विचाराचा प्रचार आणि प्रसार केला जातो. हिंसकवृत्तीला हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या विचाराच्या विरोधात गांधीनी दाखवलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन चरखा संघातर्फे केले जाते. दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये. महापालिका प्रशासनाच्या विरोधातही चरखा संघाचे कार्यकर्ते शांततेच्या माध्यमातून आंदोलन करताना रविवारी दिसले. यापूर्वीही अशाच पद्धतीने काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी गोडसे प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले होते. हिंसेच्या विरुद्ध शांतीप्रियमार्गाने आंदोलन हाच पर्याय असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्रिमूर्तीनगर उद्यानात दर रविवारी चरखासंघा तर्फे चरखा प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून गांधीविचारांच्या लोकांना जुळवणे हा उद्देश असल्याचा दावा गुडधे करतात.