विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच निवडणूक लढणार असून उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.पटोले यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पटोले यांनी सांगितले की, अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे लढतीसाठी सात उमेदवारांची नावे असून त्यात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, सुधीर ढोणे, मिलिंद चिमोटे, श्याम प्रजापती, भैय्यासाहेब मेटकर यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्ष ही जागा लढवणार, हे स्पष्ट आहे. लढतीविषयी नुटा, विज्युक्टा आणि इतर संघटनांच्या प्रतिनिधींसोबतच चर्चा करण्यात येत असून त्यानंतर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>नागपूर: मेडिकलच्या रॅगिंग प्रकरणी सहा विद्यार्थ्यांना दिलासा; इंटर्नशिप बहाल, वसतिगृहात मात्र प्रतिबंध
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेला लढतीची संधी देण्यात आली होती, त्यामुळे पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडीतर्फे लढत देईल, यावर मतैक्य झाले आहे. आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवू, मतदार नोंदणीपासून ते प्रचार यंत्रणेपर्यंत सर्व सज्जता झाली आहे. शिक्षक, पदवीधर संघटनांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि येत्या १२ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे पटोले यांनी सांगितले. येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक डॉ. सुनील देशमुख यांनी लढवावी, असा आग्रह केल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.