नागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षशिस्त निर्माण करण्यासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे सुतोवाच केले आहे. त्याच धोरणानुसार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीतील बेशिस्त पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज
नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील राणी कोठी येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी यांच्यातील रुसवे-फुसगे आणि बैठकीला काहींची गैरहजेरी अशी स्थिती होती. याबाबत पटोले म्हणाले, पक्षामध्ये या गोष्टी चालत असतात. गैरहजर असण्याची वैयक्तिक काही कारणे असू शकतात. पण, विनापरवानगी बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई देखील करण्यात येईल. मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर पक्षात बरेच बदल केले आहे. त्यामुळे निष्क्रिय आणि बेशिस्त पदाधिकाऱ्यांना सुधारणा करावी लागेल.