लोकसत्ता टीम
नागपूर: शेतीच्या यंदाच्या दोन्ही हंगामात अस्मानी व सुल्तानी संकट आलेले आहे. खरिप हंगामात निसर्गामुळे शेतपिकांचे नुकसान झाले तर रब्बी हंगामात महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रश्नावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. ऊर्जा खाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळे विजेच्या प्रश्नावर आंदोलन करून काँग्रेस फडणवीस यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे यांनी काँग्रेसच्या सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. पत्रात गावंडे यांनी लिहले की, महावितरणच्या भारनियमनाबाबतच्या निर्णयामुळे हाता तोंडाशी आलेले पिक शेतकऱ्याच्या पदरात पडते की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. कृषीपंपाना १२ तास वीज देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतू ८ तास देखिल वीज मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना सलग १२ तास तरी वीज दिली पाहिजे.
आणखी वाचा-तरुणीच्या प्रेमासाठी प्रियकर बनला तोतया सैन्यअधिकारी, डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला अन्…
भाजप प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असून भारनियमनाच्या निर्णयामुळे शेती व शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे त्यांचे धोरण आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून आपणास कळविण्यात येते की, महावितरणकडून चालू केलेले भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांना नियमीत वीज पुरवठा मिळावा या करीता राज्य सरकारच्या विरोधात १८ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक स्तरावर आंदोलन करण्यात यावे. हे आंदोलन ब्लॉक स्तरावर करावयाचे असल्याने ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
आजी-माजी आमदारांनी सहभागी करण्याची सूचना
सदर आंदोलनात काँग्रेसने ब्लॉक मधील आजी माजी खासदार / आमदार, प्रदेश जिल्हा पदाधिकारी, जिल्ह्यातील आघाडी संघटना सेल व विभाग यांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांचे सदस्य यांना सहभागी करून घ्यावे. आपण केलेल्या आंदोलनाचा छायाचित्रांसह अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवण्याची सूचनाही केली आहे.
आणखी वाचा-Video : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटक वाहनांनी अडवली वाघाची वाट
प्रतिसाद कसा मिळणार?
काँग्रेस पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा खात्याच्या विरोधात राज्यभरात आंदोलन पेटण्याचे चित्र आहे. दरम्यान नुकतेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीही जाहिर झाली. त्यामुळे आता काँग्रेसकडून होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याच्या विरोधातील आंदोलनाला राज्यात कसा प्रतिसाद मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.