लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: वर्धा बाजार समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी झाल्या. अध्यक्षपदी आमदार कांबळे गटाचे अमित गावंडे व याच गटाचे पांडुरंग देशमुख उपाध्यक्ष पदी निवडून आले. आघाडी असणाऱ्या माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख गटाला आमदार कांबळे गटाने हिसका दिल्याने सहकार गटात कमालीची निराशा पसरली आहे.

निवडणुकीत कांबळे व देशमुख गटाची वर्धा व देवळी येथे आघाडी होती. त्याच वेळी देवळीचे अध्यक्षपद कांबळे तर वर्धेचे देशमुख गटाला देण्याचे ठरले. उपाध्यक्ष पद वर्धेत कांबळे तर देवळी येथे देशमुख गटास निश्चित करण्यात आले. त्यानुसार देवळी येथे घडले. मात्र, आज वर्धा येथे ठरल्यानुसार अध्यक्षपद देशमुख गटाला मिळणे अपेक्षित होते. ऐनवेळी कांबळे गटाच्या काहींनी आपले सदस्य अधिक असल्याने दोन्ही पदे आपणच ठेवावी, असा आग्रह धरला. तो मान्य करीत कांबळे गटाने निरुपाय असल्याचा निरोप देशमुख गटास दिला. हे ऐकून सुन्न झालेल्या देशमुख गटाची पाठीत खंजीर खुपसल्याची भावना झाली. त्यांनी निवडणूक असलेल्या बाजार समिती सभागृहाला पाठ दाखवत बहिष्कार टाकला.

हेही वाचा… नागपूर: बिल्डरची १.८० कोटींनी फसवणूक

वेळेवर त्यांना उपाध्यक्ष पद देण्याची तयारी कांबळे गटाने दाखविली. ती फेटाळून लावण्यात आली. आजवर देशमुख गटाच्याच ताब्यात राहिलेल्या वर्धा बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला. या तडजोडीचे साक्षीदार सुधीर कोठारी यांनी भाष्य करण्याचे टाळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress won in wardha market committee president election pmd 64 dvr