अमरावती : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या समर्थनार्थ सुरत येथे जात असलेल्‍या काँग्रेसच्या नेत्‍यांची आणि कार्यकर्त्‍यांची पोलिसांकडून अडवणूक होत असल्‍याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. वलसाड येथील नाक्‍यावर आपले वाहन अडवण्‍यात आले आणि चौकशी करण्‍यात आली. शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते, त्‍यावेळी अशीच चौकशी केली होती का, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा अन् वादाला तोंड; कोण बाजी मारणार, आ. पंकज भोयर की समीर कुणावार?

मानहानी प्रकरणात सुरत येथील न्‍यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. सुरत न्‍यायालयाच्‍या या निर्णयाला ते आव्‍हान देणार असून आज याचिका दाखल करणार आहेत. राहुल गांधी यांना पाठिंबा देण्‍यासाठी काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते गुजरातकडे आज रवाना झाले. यशोमती ठाकूर या देखील सुरतकडे निघाल्‍या. गुजरातच्‍या सीमेवर वलसाड येथे त्‍यांचे वाहन गुजरात पोलिसांनी अडवले. त्‍यावेळी दोन कॅमेराधारक पोलीस कर्मचारी त्‍यांच्‍यासमोर हजर झाले. या कॅमेरातून थेट प्रक्षेपण हे गांधीनगरमध्‍ये केले जात असून तेथे तुम्‍हाला बघितले जात आहे, असे पोलिसांनी सांगितल्‍याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : पवारांकडून गडकरींचं कौतुक आणि काही सूचनाही, नक्की काय म्हणाले?

आमचे नेत राहुल गांधीं गुजरातमध्‍ये येत आहेत. त्‍यांच्‍या समर्थनासाठी आम्‍ही जाऊ शकत नाही का, असा सवाल करीत यशोमती ठाकूर यांनी आम्‍ही कुणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा, असे पोलिसांना सुनावले. यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला. थोड्या वेळाने त्‍यांचे वाहन सोडण्‍यात आले. भारतासारख्‍या देशात एका राज्‍यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल तर ही बाब गंभीर आहे. राज्यातील सत्तांतरासाठी गुजरातने बंडखोर आमदारांना ‘रेड कार्पेट’ टाकून सुरक्षा दिली आणि आज काँग्रेसच्या आमदारांची अडवणूक केली जात आहे, याचा निषेधही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress workers going surat in support of rahul gandhi stopped by police says mla yashomati thakur mma73 zws
Show comments