नागपूर : काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेची जय्यत तयारी पक्षाने केली असून या सभेद्वारे आगामी निवडणुका लक्षात घेऊन ‘शक्तिप्रदर्शन’ केले जाणार आहे. या सभेत तीन मोठ्या व्यासपीठावर पाचशेहून अधिक नेते, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी विराजमान होणार आहेत. महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या शेजारच्या राज्यातून कार्यकर्ते, नागरिकांना एकत्र आणून मोठे शक्तिप्रदर्शन काँग्रेस करणार आहे.
सभेसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी नागपुरात दाखल होत आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते यापूर्वीच नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. एका खासगी बांधकाम कंपनीच्या सुमारे २४ एकर जागेवर ही सभा होत आहे. यासाठी तीन मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. मध्यभागी असलेल्या व्यासपीठावर सुमारे ५५ ते ६० नेते बसतील तर त्या व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला सुमारे ४५० जणांची क्षमता असलेले दोन मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या तीनही व्यासपीठापासून काही अंतर राखून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेत महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीगड आणि मध्यप्रदेशमधून सुमारे चार ते पाच लाख नागरिक उपस्थित राहतील, असा दावा आयोजन समितीचे सदस्य गिरीश पांडव यांनी केला.
हेही वाचा… ‘त्या’ शासकीय परिपत्रकाची होळी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप; संपावर तोडगा काढण्याऐवजी…
आऊटर रिंगरोडच्या शेजारील गावात वाहनतळ
या सभेला येणाऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था आऊटर रिंगरोडच्या जवळच्या विहीरगाव, पाचगाव आणि कळमन्यात करण्यात आली आहे. शेजारील राज्यातून येणारी वाहने आऊटर रिंगरोडकडून येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील. तसेच सभास्थळापाशी वाहतूक कोंडी होणार नाही, असा आयोजकांचा दावा आहे.
हेही वाचा… अपहृत मुलीचा तब्बल सात वर्षांनंतर शोध, अज्ञाताने फुस लावून गुजरातला…
हुकूमशाहीविरुद्ध स्पष्ट संदेश – पटोले
गेल्या दहा वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने काही निवडक उद्योगांच्या फायद्यासाठी काम केले. त्यामुळे महागाई, शेतकरी, कामगार, युवकांचे प्रश्न गंभीर झाले. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. हा संदेश या सभेतून दिला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सभेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पटोले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, आज पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीतून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात आहे. ६० वर्षांच्या काँग्रेस सत्तेत पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत भारताला एक महाशक्ती म्हणून उभे करण्यात आले. पण, दुर्दैवाने मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला रसातळाला नेले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, त्यांना घाबरवले जात आहे, असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा… …मागेल त्याला विहीर, नावापुरतीच! दलाल सक्रीय, मंजुरीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट
निवडणुका जिंकण्यासाठी आणखी प्रयत्न हवेत – वासनिक
आम्हाला अधिक सक्रिय होऊन निवडणुकांना सामोर जावे लागेल, शक्ती लावावी लागेल. त्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी व्यक्त केले. अलीकडे काँग्रेसचा तीन राज्यात पराभव झाला त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, पराभवाची अनेक कारणे असू शकतात. यंत्रणेचा गैरवापर भाजपकडून होत राहतो. त्यांनी निवडणूक जिंकल्याने लोकांचा विश्वास प्राप्त केला असे नाही.