नागपूर : सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला दोन कोटींहून अधिक किमतीच्या सोन्यासह नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेली ही कारवाई गुप्त ठेवण्यात आली. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.
कोलकताहून आझाद हिंद एक्सप्रेसने एक व्यक्ती सोन्याची बिस्किटे घेऊन निघाल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली आहे. नागपूर स्थानकावर अधिकारी पाळत ठेवून होते. १७ जानेवारीला सायंकाळी ही रेल्वे नागपुरात येताच झडती घेण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून २ कोटी ७ लाख २ हजार १४० रुपयांचे ३ किलो ३४१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. सीमाशुल्क वाचवण्यासाठी सोन्याची बिस्किटे बांग्लादेशहून खरेदी केली जातात. त्यानंतर तस्करमार्फत सीमा पार करून भारतात येतात. त्यानंतर कोलकाता मार्गे देशाच्या विविध राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना सोन्याची बिस्किटे पोहचवली जातात.
आरोपी मूळचा मुंबईचा रहिवासी असून आझाद हिंद एक्सप्रेसने कोलकताहून सोन्याची बिस्किटे घेऊन निघाला होता. नागपूर रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर दुसऱ्या गाडीने तो मुंबईला जाणार होता. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर जाळे पसरवले. तो मुंबईला जाणान्या गाडीच्या प्रतीक्षेत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कंबरेला चारही बाजूने गुंडाळलेल्या कापडात सोन्याची चार बिस्किटे होती. अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपीने मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याला सोन्याची बिस्किटे पोहोचती करणार असल्याचे आरोपीने सांगितले. डीआरआयच्या पथकाने सखोल चौकशी केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये आरोपीची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.